पान:इहवादी शासन.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १८१
 


सुलतानांना निमंत्रण

 भारतांत राहवयाचें, पण भारतीय कधीहि व्हावयाचें नाही, असें मुस्लिमांचें तत्त्वज्ञान असल्यामुळेच कोणत्याहि आपद्प्रसंगी ते भारतीयांना साह्यार्थ पाचारण न करतां भारतबाह्य मुस्लिम सुलतानांनाच आवाहन करीत. बाराव्या शतकांतील सूफी चिस्ती याने शिहाबुद्दीन घोरीला पाचारण केलें. बहुलोल लोदी याने अफगाण टोळ्यांना बोलावलें. त्याच प्रघातानुसार वलीउल्लाने अहमदशहा अब्दालीची प्रार्थना केली की, भारतांत येऊन त्याने इस्लामचें रक्षण करावें. त्याच्या मुलाचा शिष्य सय्यद अहंमद बरेलवी याने शिखांविरुद्ध जिहाद पुकारून अफगाण व पठाण टोळ्यांना असेंच निमंत्रण दिलें होतें. आज भारतामध्ये राहून, 'पाकिस्तान झिंदावाद' अशा घोषणा करून पाकिस्तानच्या साह्याची याचना करणारे मुस्लिम, तीच परंपरा पुढे चालवीत आहेत.
 वलीउल्ला पंथीयांनी जी चेतावणी दिली तिचाच परिपाक म्हणजे सय्यद अंंमद बरेलवी याने पंजाबातील महाराजा रणजितसिंग यांच्याविरुद्ध केलेली उठावणी हा होय. सय्यद अहंमद याने कलकत्त्यापासून पेशावरपर्यंत जिहादचा पुकारा करून एक लाख मुस्लिम धर्मयुद्धासाठी उभे केले. पेशावरला आपले राज्य स्थापन केलें व तो स्वतः खलिफा झाला. पण अशा सर्व इस्लामी शक्तीसह तो रणजितसिंहावर चालून गेला असतांनाहि शिखांनी त्याच्या सेनेचें निर्दालन केलें व त्याला बालाकोटच्या लढाईत ठार मारलें (१८३१). पण वलीउल्लापंथी व वहाबीपंथी लोक स्वस्थ बसले नाहीत.
 इंग्रजांनी पुढे शिखांचें राज्य नष्ट केलें तरी मुस्लिम सत्ता नष्ट झाल्यामुळे भारत हा 'दार उल् हरब'च राहिला. तो 'दार उल इस्लाम' होईपर्यंत जिहाद चालू ठेवलेंच पाहिजे अशी इस्लामची आज्ञा आहे, हें तर वहाबीपंथाचें मुख्य सूत्र. त्याप्रमाणे इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांनी १८६५ सालापर्यंत अनेकदा उठावणी केली. १८५७ सालीं स्वातंत्र्ययुद्धांत मुस्लिम सामील झाले होते ते याच प्रेरणेने. त्या युद्धाच्या उठावणीचें कार्य हिंदु-मुस्लिम दोन्ही जमातींनी केलें होतें. पण विजयानंतर सत्ता दिल्लीच्या पातशहाचीच राहवयाची होती. त्यामुळे भारत हा 'दार उल इस्लाम' होणार होता. पण त्या युद्धांत पराभव झाला; आधीच्या व नंतरच्या वहाबीयांच्या बंडाळ्या इंग्रजांनी क्रूरपणें निकालांत काढल्या आणि मुस्लिम हे आपले हाडवैरी आहेत हे जाणून त्यांची सत्ता, धनदौलत, त्यांचें वर्चस्व यांचा नायनाट करून टाकला.
 याच वेळीं सर सय्यद अहंमद खान यांचा उदय झाला. त्यांनी इंग्रजी सत्ता, पाश्चात्त्य विद्या व धर्मपरिवर्तन यांसाठी मुस्लिमांची मनें वळविली आणि इंग्रजी सत्ता ही परकी सत्ता असली, तरी त्या सत्तेखालीहि भारत हा 'दार उल इस्लाम'च आहे, इंग्रजांना शत्रु मानून या देशाला 'दार उल हरव' मानण्याचें कारण नाही, अशी विचारसरणी मुस्लिम समाजांत प्रसृत केली.