पान:इहवादी शासन.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८० । इहवादी शासन
 


धर्मयुद्धाची आज्ञा

 औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य विस्कटलें, मोडकळीस आलें. मराठ्यांनी हिंदुस्थानांतील सर्व प्रदेशांत मुस्लिम सत्ता खिळखिळी करून शेवटीं नष्ट करून टाकली. याच काळांत उत्तर हिंदुस्थानांत शीख व जाट यांचा उदय होत होता. यामुळे मुस्लिम सत्ताच नव्हे, तर इस्लाम धर्मच नष्ट होणार अशी भीति मुस्लिमांना वाटू लागली. इस्लाम धर्मांत राजकारण व धर्म हे अविभाज्य आहेत. मुस्लिम समाज जेथे आहे तेथे मुस्लिमांचीच सत्ता असली पाहिजे असा इस्लामचा दंडक आहे. कांही कारणांनी ती सत्ता नष्ट झाली, तर परक्या सत्तेशीं जिहाद म्हणजे धर्मयुद्ध पुकारून मुस्लिमांनी ती नष्ट केली पाहिजे आणि तो देश पुन्हा 'दार उल इस्लाम' (इस्लाम सत्तांकित) केला पाहिजे; आणि हें न जमलें, तर त्या देशाचा त्याग केला पाहिजे, अशी मुल्ला-मौलवींच्या मतें इस्लामची आज्ञा आहे. मोगल साम्राज्य विनाशपंथाला लागल्यानंतर येथल्या मुस्लिम नेत्यांनी त्या दृष्टीने पावले टाकण्यास प्रारंभ केला.


 अठराव्या शतकाच्या आरंभी अरबस्तानांत वहाब नांवाचा एक मुस्लिम धर्मनेता उदयाला आला. तो जीर्णमतवादी, दुराग्रही, परिवर्तनविरोधी व सुधारणाद्वेष्टा असा होता. सरहिंदीनंतर भारतीय मुस्लिमांवर त्याचें वर्चस्व प्रस्थापित झालें. या शतकांतील भारतीय मुस्लिमांचा नेता शहा वलीउल्ला, त्याचा मुलगा अब्दुल अझीझ, त्याचा नातू महंमद इशाक आणि त्याचा शिष्य सय्यद अहंमद बरेलवी (१७७६- १८३१) हे कमीअधिक प्रमाणांत वहाबीपंथी होते. वलीउल्ला प्रथम कांही प्रमाणांत परिवर्तन व सुधारणा यांना अनुकूल होता, पण भारतीय जनतेशीं मुस्लिमांनी कधीहि एकरूप होता कामा नये, हें त्याचें मुख्य सूत्र होतें.
 डॉ. आय्. एच्. क्युरेशी म्हणतात, "हिदुस्थानांतील जीवनाशीं मुस्लिमांनी एकात्म होण्यास वलीउल्लांचा सक्त विरोध होता. सर्व बाहेरच्या मुस्लिम जगाशींच त्यांचे संबंध जागते राहिले पाहिजेत; तरच इस्लामचें खरें तेज, खरें सत्त्व त्यांच्या ठायीं जिवंत राहील, असें तो म्हणे." (करंदीकर, इंडियाज् ट्रँझिशन, पृष्ठ १२८) . भारतांत मुस्लिमांचा पराभव झाला तो हिंदूंशी संपर्क आल्यामुळे, त्या काफरांच्या संबंधामुळे, इस्लामला जें मालिन्य आलें त्यामुळे झाला, असें वलीउल्ला सांगत असे. थोडक्यांत म्हणजे मुस्लिम हे हिंदी झाले, भारतीय झाले हें इस्लामच्या सर्व अधःपाताचें कारण होय असें त्याचें मत होतें. त्यामुळेच या दोन जमाती पृथक्, अलिप्त व विभक्त राहिल्या पाहिजेत असा आयुष्यभर प्रचार करून त्याने अर्वाचीन काळांतल्या विभक्त वृत्तीचा पाया दृढ करून टाकला.