पान:इहवादी शासन.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १७९
 

आणि इस्लाम हे ध्रुवभिन्न आहेत आणि हिंदु इस्लामचे हाडवैरी आहेत. तेव्हा हिंदूंशी पावलोपावलीं शत्रुत्व करणें हेंच खऱ्या मुस्लिमांचें कर्तव्य होय," अशी त्याचीं मतें होतीं. अकबराच्या उदार धोरणामुळे मुस्लिम लोक, दसरा, दिवाळी, शिवरात्र या हिंदूंच्या व नवरोजसारख्या पारशांच्या सणोत्सवांत मिसळू लागले होते. सरहिंदीने याचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जहांगीराचा प्रथम सरहिंदीला विरोध होता, पण लष्करावर व अनेक सरदारांवर त्याचा मोठा प्रभाव आहे हें ध्यानीं घेऊन त्याने तो विरोध मागे घेतला व स्वतःच त्या पंथांत तो सामील झाला. यामुळेच जहांगीवर व शहाजहान यांच्या कारकीर्दीत पुन्हा पहिले अत्याचार चालू झाले. सरहिंदीचे अनुयायी हे सर्व कडवे सुन्नी होते. त्यामुळे शियापंथीय मुस्लिमांचा ते भयंकर द्वेष करीत व त्यांच्यावरहि वरवंटा फिरवीत. स्वधर्मांतल्याच एका पंथाच्या अनुयायांशी सुद्धा ज्यांना सहजीवन वर्ज्य होते ते हिंदु समाजाशीं कसें हाडवैर धरीत असतील हें सांगण्याची गरज नाही.

सरहिंदीचा प्रभाव

 सरहिंदीचा प्रभाव दिवसेदिवस वाढतच गेला आणि त्याच्या अंध, हेकट, पिसाट धर्ममतांचा औरंगजेबाच्या कारकीर्दीत कळस झाला. दारा शिकोह हा औरंगजेबाचा भाऊ फारच उदार मताचा होता. वेद, उपनिषदें या हिंदु धर्म-ग्रंथांचा त्याने अभ्यास केला होता आणि त्यांबद्दल त्याला आदरहि वाटत असे. पण त्यामुळेच औरंगजेब व त्याचे कट्टर अनुयायी सुन्नी सरदार यांचा त्याच्यावर भयंकर रोष होता. त्याला ठार मारून औरंगजेबाने गादी बळकावली आणि मग तघलख, लोदी यांनाहि लाजवील असे अत्याचारांचें थैमान त्याने मांडलें. साकी मुस्तांदखान हा औरंगजेबाचा समकालीन चरित्रकार 'मसिरी-इ-आलमगिरी' या आपल्या चरित्रांत म्हणतो की, "हिंदु हे इतक्या अवमानीत, हीन पातळीला पूर्वीच्या कोणत्याच राज्यांत गेले नव्हते." (इस्लाम इन इंडियन ट्रॅझिशन टु मॉडर्निटी- करंदीकर, प्रकरण चौथें).
 सरहिंदीविषयी लिहितांना प्रा. अझीझ अहंमद म्हणतात की, "आज भारतांत इस्लामला जें दुराग्रही व जीर्णमतवादी रूप आले आहे तें त्या वेळीं सरहिंदीने स्वकालीन बुद्धिवाद व उदारमतवाद यांवर जो सहज विजय मिळविला त्याळेच होय. आज भारतीय मुस्लिम समाज सहजीवन विरोधी, सनातनी, सुधारणाद्वेषी, मनांत परिवर्तन मान्य असूनहि प्रत्यक्षांत आणण्यास न धजणारा व इतर संस्कृतीपासून विभक्त असा झाला आहे तो सर्व सरहिंदीच्यामुळेच होय. याचें कारण उघड आहे. अर्वाचीन भारतांतील सर सय्यद अहंमद, इक्बाल, अबुल कलम आझाद इत्यादि नेते केव्हा ना केव्हा तरी सरहिंदीच्या वर्चस्वाखाली आलेले होते. (इस्लामिक कल्चर, पृ. १३९).