पान:इहवादी शासन.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६ । इहवादी शासन
 

प्रती काढून, त्या वांटण्यांत आल्या. रशियांत धर्मछळ झाला हें पूर्ण असत्य आहे, असें त्या ग्रंथांत प्रतिपादन करण्यांत आलें आहे. टास एजन्सीने लिहिलें की, प्राचीन काळापासून रशियन लोक धर्मनिष्ठ आहेत. जर्मनांवर आम्ही विजय मिळवू शकलों, हें त्या निष्ठेच्या बळावरच होय. १०/४/४५ रोजी स्टॅलिनने जें धर्मविषयक भाषण केलें तें कर्मठ सनातन्यांपेक्षाहि सनातनी होतें.

खऱ्या शक्तीची ओळख

 हिटलर सत्तारूढ होऊन त्याच्या रशियाविरोधी गर्जना सुरू झाल्या तेव्हाच सोव्हिएट नेत्यांच्या ध्यानांत आले की, जगांतील कामगारांचें ऐक्य, वर्गविग्रह मार्क्सवाद, त्यांतील ऐतिहासिक जडवाद या सर्व शिळोप्याच्या गोष्टी आहेत. धर्म, राष्ट्र याच खऱ्या शक्ति आहेत. तेव्हा त्यांची अवहेलना होता कामा नये. १९३६ साली मॉस्को येथील कॅमेरमी थिएटरने 'सरदार' हे संगीत नाटक रंगभूमीवर आणले. त्यांत आठव्या नवव्या शतकांत रशिया ख्रिस्तधर्मी झाला या घटनेची घाणेरडी निंदा केलेली होती. ख्रिस्ती धर्मदीक्षा म्हणजे स्वैर भोगाची दीक्षा, असें वर्णन केलें होतें. सरकारी कलामंडळ, सेन्सॉरबोर्ड यांनी त्या नाटकाला मान्यता दिली होती. वर्तमानपत्रांनी त्याचा गौरव केला होता. डेमियन वेंडी या त्या काळच्या विख्यात क्रेमलिनमान्य कम्युनिस्ट कवीने तें नाटक लिहिलें होतें. त्याचे प्रयोग रंगत होते. प्रेक्षक टाळी देत होते. इतक्यांत सर्व चक्र फिरलें. वादळी वेगाने शासनाने- इहवादी, सेक्युलर, जडवादी, सोव्हिएट सरकारने- त्या नाटकावर प्रहार केला. दिग्दर्शक, लेखक सर्वांना ठपका दिला. आणि रशियांत ख्रिस्ती धर्मामुळे फार मोठी प्रगति झालेली आहे, रशिया त्यामुळे सुसंस्कृत झाला आहे, असें नवें मत प्रमृत करण्याची सर्वांना आज्ञा दिली.
 युद्ध सुरू होतांच ख्रिस्ती, मुस्लिम धर्माचार्य स्टॅलिनची स्तुति गाऊन 'तुं परमेश्वराचा प्रेषित आहेस,' 'अल्लाच्या कृपेने तुला जय मिळेल,' असे आशीर्वाद त्याला देऊं लागले. आणि शासकीय मुखपत्र 'प्रवदा' यांत ते प्रसिद्ध होऊं लागले.

डिमिट्रीचा गौरव

 १९४१ सालीं वोरोडिन नामक लेखकाने 'डिमिट्री डॉनस्कॉय' या नांवाची एक कादंबरी लिहिली. ही साधारण हरिभाऊंच्या 'उषःकाल' या कादंबरीसारखी आहे. तिच्यांतील कथानक १३७८ सालचें आहे. दोनशे वर्षे तार्तराचें रशियावर राज्य होते. 'डिमिट्री डॉनस्कॉय' या वीरपुरुषाने तार्तरांचा पराभव करून रशियाला स्वातंत्र्य मिळवून दिलें, त्याची ही कथा आहे. कादंबरीतील विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे डिमिट्रीचे गुरु मेट्रॉपॉलिटन अलेक्सी यांचा तींत गौरव केला आहे. "अलेक्सीस्वामींनीच लहानपणापासून डिमिट्रीच्या मनावर शौर्यधैर्याचें, राष्ट्रभक्तीचे संस्कार केले व त्याला नेतृत्वाचें शिक्षण देऊन तयार केलें. त्यांचे अनेक शिष्य सर्वत्र