पान:इहवादी शासन.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १७७
 

मुस्लिम हे भारताशीं, येथल्या समाजाशीं, येथल्या संस्कृतीशीं कधीहि एकरूप झाले नाहीत. एवढेच नव्हे, तर हिंदु समाजाशी एकरूप होण्याचें त्यांनी कटाक्षाने, निर्धाराने टाळले आहे. अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, अरबस्तान, इजिप्त आदि देशांत व जगांत अन्यत्र जे जे मुस्लिम आहेत ते सर्व मिळून आपण एक मुस्लिम जमात, एक मस्लिम विश्व असेंच भारतीय मुस्लिम तेव्हापासून आजपर्यंत मानीत आलेले आहेत. विश्व- मुस्लिमवाद- पॅन इस्लामिझम्- हा शब्द अलीकडचा आहे. पण त्यांतील भावना जुनीच आहे.
 'स्टडीज् इन् इस्लामिक कल्चर इन् दि इंडियन एन्व्हिरान्मेंट' या आपल्या लेखांत प्रा. अझीझ अहंमद म्हणतात की, अर्वाचीन परिभाषा वापरून बोलावयाचें तर दिल्लीचा सुलतान शमसुद्दीन अल्तमश (१२१०- १२३५) हा भारतांतील पहिला पॅन्इस्लामिस्ट होय. "जगांतील सर्व मुस्लिम हें स्वतंत्र मुस्लिम विश्व असून, बगदादचे आब्बासीद खलिफा हे त्याचे धार्मिक व राजकीय शास्ते होत" अशी त्याची श्रद्धा होती. तेथून पुढे तीनशे वर्षे भारतांतील मुस्लिम पातशहा किंवा सुलतान बगदादच्या वा तुर्कस्थानांतील कॉन्स्टान्टिनोपलच्या खलिफाचा शिक्का व त्याची मंजुरी आपल्या सत्तेला मिळविण्यांत भूषण मानीत असत.

वेगळेपणाची जाणीव

 आपण भारतीय समाजाचे घटक नसून, मुस्लिम विश्वाचे घटक आहों, या वेगळेपणाच्या, पृथकतेच्या भावनेचीच जोपासना भारतीय मुस्लिम आज शतकानुशतकें करीत आहेत. अझीझ अहंमद म्हणतात, "भारताचा मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहास हा हिंदु-मुस्लिमांच्या धार्मिक व सांस्कृतिक तणातणीचा, तेढीचा, संघर्षाचाच आहे. समरसता, एकतानता, ऐक्य हीं अपवादात्मक." जदुनाथ सरकार, आर. सी. मुजुमदार यांचे याच अर्थाचे उतारे देऊन अझीझ अहंमद यांनी त्याला मान्यता दिली आहे. "मुसलमान हा हिंदुस्थानांत होता, पण तो हिंदुस्थानचा नव्हता," असें जदुनाथ म्हणतात आणि प्रा. मुजुमदारांनी म्हटलें आहे की, "हिंदू व मुस्लिम या दोन जमातींचा सण, उत्सव, चालीरीति यांद्वारा जो संपर्क आला तो वर्तुळाच्या परिघापुरताच होता. संस्कृतीचीं जीं प्राणभूत तत्त्वें त्यांचा अल्पांशहि एका जमातीने दुसरीचा घेतलेला नाही." आणि अशा रीतीने मुस्लिम हे भारतांत बव्हंशी परकीयच राहिले.
 गेल्या शतकांत तुर्कस्थानचा सुलतान अब्दुल हमीद याने आपली जीर्ण प्रतिगामी सत्ता टिकविण्यासाठी पॅन इस्लामची चळवळ हेतुतः सुरू केली. तेव्हा भारतांतील मुल्ला-मौलवींनी तिला पाठिंबा देऊन, सर सय्यद अहंमद यांचे मुस्लिम समाजांत इहवादी तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. बंगालची फाळणी रद्द झाल्यापासून म्हणजे १९१२ नंतर भारतीय मुस्लिम शुक्रवारच्या
 इ. शा. १२