पान:इहवादी शासन.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतांतील
इहवादविरोधी शक्ति




मुस्लिम



 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या तेवीस वर्षांच्या काळांत राष्ट्रसंघटना, लोकशाही संरक्षणसामर्थ्य, यांपैकी कोठल्याच दृष्टीने भारताची प्रगति झालेली नाही. उलट अगदी उद्वेगजनक अशी परागतीच झालेली आहे. या परागतीला कोणत्या इहवाद- विरोधी शक्ति कारणीभूत झाल्या, त्या शक्तींनी इहवादी तत्त्वज्ञानाची गळचेपी कशी केली व भारताच्या रथाची गति कुंठित करून त्याला चढणीच्या ऐवजी घसरणीच्या मार्गाला कसें लावलें तें आता पाहवयाचें आहे. तें पाहतांना प्रथम मुस्लिम जमातीचा विचार करूं.
 १२०६ सालीं हिंदुस्थानांत मुस्लिमांचें राज्य प्रस्थापित झालें. त्याच्या आधी महंमद कासीम याने ७११ सालीं सिंध प्रांत जिंकला होता व अकराव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षांत गझनीच्या महंमदाने दहा बारा स्वाऱ्या करून अपार लूट येथून नेली होती. पण त्यांपैकी कोणी भारतांत स्थिर राज्य स्थापिलें नव्हतें. शिहाबुद्दीन महंमद घोरी याने तें १२०६ साली स्थापन केलें व तेव्हापासून १७५० पर्यंत, मराठ्यांनी दिल्लीच्या मोगल बादशहाला निष्प्रभ करीपर्यंत, जवळ जवळ साडेपांचशे वर्षे उत्तर हिंदुस्थानांत तरी निदान मुस्लिमांची सत्ता अव्याहत चालू होती. या काळांत महाराष्ट्र व आंध्र येथेहि मुस्लिमांची सत्ता साडेतीनशे वर्षे होतीच. पुढच्या काळांत मोगल साम्राज्य बुडालें तरी अयोध्येचे नवाब, बंगालचे सुभेदार, हैदरावादचे निजाम आणि म्हैसूरचे हैदर व टिपू यांच्या सत्ता त्या त्या प्रदेशांत अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालू होत्या.
 मुस्लिम सत्तेच्या या सहाशे वर्षांच्या काळाकडे पाहून, भारतीय समाजाच्या एकात्मतेच्या दृष्टीने विचार करतां, पहिली गोष्ट स्पष्ट दिसते ती ही की, भारतांतले