पान:इहवादी शासन.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १७५
 

वादाच्या मंथनांतून निघतात असे आपल्याला त्यावरून दिसून येईल. इहवादावांचून कर्तृत्व नाही, महापुरुष परंपरा नाही, समाज प्रगति नाही, राष्ट्र संघटना नाही, लोकशासन नाही. प्राचीन काळीं इहवादाचा अवलंब केल्यामुळेच भारताला वैभव प्राप्त झालें. मध्यंतरी त्याच्या त्यागामुळे तमोयुग निर्माण झालें आणि गेल्या शतकांत त्याच्या तत्त्वांचे पुनरुज्जीवन झाल्यामुळेच भारताची सर्वांगीण प्रगति होऊन आपल्याला राष्ट्र संघटना, स्वातंत्र्यप्राप्ति व लोकशासनाची स्थापना यांत यश आले असा या सर्वविवेचनाचा मथितार्थ आहे.

विरोधी शक्ति

 भारतांतील इहवादाच्या निरूपणाचा पूर्वार्धं येथे संपला. उभरार्धामध्ये येथल्या इहवादविरोधी शक्तींचा परामर्श घ्यावयाचा आहे. मुस्लिमांचा जमातवाद ही प्रबळ अशी विरोधी शक्ति आहे. मुस्लिम नेत्यांना इहवाद मान्य नाही, राष्ट्रवाद मान्य नाही व लोकशाही पण मान्य नाही. बहुसंख्य मुस्लिम समाज अजून शब्दप्रामाण्य, धर्माची अपरिवर्तनीयता, असाहिष्णुता, विषमता याच जीर्ण, अंध, प्रतिगामी तत्त्वांच्या सत्तेखालीच आहे. यामुळेच पाकिस्तानची निर्मिति झाली व यामुळेच भारतांत आणखी पाकिस्तानें निर्माण होण्याचा धोका आहे.
 दुसरी विरोधी शक्ति म्हणजे साम्यवाद किंवा कम्युनिझम. मार्क्सवादावर किंवा खरें म्हणजे माओ, कोसिजिन यांच्यावर त्यांची, ख्रिश्चनांची जशी पोपवर, तशीच अंधश्रद्धा आहे. पांढरा कागद पोपने काळा ठरविला तर तो काळा आहे, असें आपण म्हटले पाहिजे, असें जेसुइटांचें तत्त्व आहे. कम्युनिस्टांचें तसेंच आहे. चेकोस्लोव्हाकियावर सोव्हिएट रशियाने आक्रमण केलें, पण कोसिजिन म्हणाला, तें आक्रमण नव्हे. भारतीय कम्युनिस्ट म्हणाले, ते आक्रमण नव्हे. जमातवादी मुस्लिमांप्रमाणेच कम्युनिस्ट हेहि राष्ट्रवाद जाणीत नाहीत, लोकशाही जाणीत नाहीत इहवाद जाणीत नाहीत ! तिसरी घातक शक्ति म्हणजे येथले निवडणूकनिष्ठ राजकीयपक्ष. तो जमातवाद हा साम्यवाद आणि भारतामध्ये अनेक शतके बद्धमूल झालेला जातीयवाद यांना, सत्ताप्राप्तीसाठी हे पक्ष चेतवून देऊन, स्वार्थ साधीत आहेत. त्यापायी ते राष्ट्राचा घात करतील. लोकशाहीचा बळी देतील. आणि इहवादाच्या सर्व तत्त्वांवर निखारा ठेवतील- ठेवलाच आहे !
 या सर्व विरोधी शक्तींचें रूपदर्शन उत्तरार्धांत करावयाचें आहे.