पान:इहवादी शासन.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४ । इहवादी शासन
 

ठरवून, त्यांच्यांतील परमेश्वरी अंशाचा विकास कदापि होऊ द्यावयाचा नाही, असें धर्मशास्त्रांत सांगून ठेवलेलें होतें. त्या धर्मशास्त्राचा उच्छेद करून तें वेदान्त तत्त्व प्रत्यक्षांत आणण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तो अर्वाचीन युगांतील टिळक, विवेकानंदं, महात्माजी या धर्म धुरीणांनीच होय. व्यक्तीसाठी समाज हें तत्त्व त्यांना संपूर्ण मान्य असून, प्रत्येकाच्या अंतरांतील चिदंशाचा विकास व्हावा म्हणूनच त्यांनी जन्मभर कष्ट केले. 'स्वराज्य' या शब्दाचा अर्थ विशद करतांना टिळक म्हणतात, "स्व म्हणजे ज्याचा तो, किंवा एकंदर लोक, किंवा प्रजा आणि त्यांचे म्हणजे त्यांच्या सल्ल्याने चालणारें राज्य तें स्वराज्य." जर्मनी, रशिया, भारतातील संस्थानें येथे स्वकीय राजा असूनहि, तेथे 'स्वराज्य' होतें, हें टिळकांना मान्य नव्हतें. कारण प्रजासत्ताक राज्य तेंच स्वराज्य, असें त्यांचें मत होतें. 'ज्याचा तो' या शब्दांना एरवी अर्थच प्राप्त होणार नाही. समाज-संघटना टिळकांनाहि हवी होती व संघटनेत बहुमताचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे, हेंहि त्यांना मान्य होतें. पण ते म्हणतात की, "बहुमताने निर्णय झाल्यावर व्यक्तीचें विचारस्वातंत्र्य संपतें असें नाही. बहुमत आपल्या बाजूस वळवून घेण्याचा व्यक्तीचा हक्क कधीहि कोणीहि हिरावून घेऊ शकत नाही. कारण विचास्वातंत्र्य हा तर राष्ट्राचा आत्मा होय. तें जेथे नाही तें राष्ट्र मेल्यासारखेंच होय." (केसरी दि. २७-८-१९०७).
 'व्यक्तीसाठी समाज' हें तत्त्व महात्माजींनी अनेक प्रकारांनी विशद करून मांडलें आहे, व्यक्ति हे ते अंतिममुल्य मानतात, हें मागे एके ठिकाणी सांगितलेंच आहे. कायद्याचें राज्य हें लोकशाहीचें तत्त्व त्यांना निश्चित मान्य आहे. पण कायदा हा अन्यायी आहे, नीतिहीन आहे असे दिसून आल्यास त्याचा शांततेच्या मार्गाने, सत्याग्रहाने भंग करण्याचा प्रत्येक व्यक्तीस हक्क आहे, असें ते म्हणतात. जें राजकीय शासनाविषयी तेंच धर्मशासनाविषयी. बुद्धीला न पटणारें विवेकाला अमान्य असणारें धर्मशासन प्रत्येक व्यक्तीने धिक्कारलेच पाहिजे ! व्यक्तीचें सुख समाजावर अवलंबून आहे, हें त्यांना मान्य आहे. पण समाजाने व्यक्तीच्या अस्मितेची जोपासना केली नाही, तर सर्व प्रगति खुंटेल असे ते बजावतात. त्या दृष्टीने ते म्हणतात की, अत्यंत उच्च पातळीवरून विचार करतां, शासनहीन समाज- व्यवस्था (अराजक) हीच आदर्श व्यवस्था होय. तेथे प्रत्येक व्यक्ति स्वयंशासन निश्चित करील. व्यवहारांत हें घडणे शक्य नाही, म्हणून समाजानें शासन स्थापिलें पाहिजे हें खरें. पण राष्ट्राचे स्वराज्य (शासन) म्हणजे व्यक्तींच्या स्वराज्यांची बेरीज आहे हे लोकांनी विसरूं नये, असें ते सांगतात.
 सामान्य व्यक्तीची ही प्रतिष्ठा त्रिकालदर्शी अर्हतेला कशी सहन होणार ?
 प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या इतिहासाचा मागोवा घेत घेत भारतांतील इहवादाचें विवेचन येथपर्यंत केलें. सोव्हिएट रशिया, मुस्लिम देश आणि पाश्चात्त्य राष्ट्रें यांच्या इहवादाच्या विवेचनावरून जे निष्कर्ष निघाले तेच भारतीय इह-