पान:इहवादी शासन.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १७३
 

ब्रिटिशांचें राज्य नसतें तर त्यांना हिंदु समाजांत राहतांच आलें नसतें. पण त्या वेळी हे लोक निर्माणच झाले नसते ! झाले नाहीत हें ऐतिहासिक सत्यच आहे. पाश्चात्त्य विद्येमुळे त्रिकाल ज्ञानाची भ्रांत कल्पना नष्ट झाली, धर्मग्रंथांचे अपौरुषेयत्व नष्ट झालें, मानवी बुद्धीचें अपूर्णत्व मान्य झालें, म्हणूनच विरोधी पक्षाला प्रतिष्ठा लाभू शकली.

व्यक्तीसाठी समाज

 समान कायदा, त्या कायद्याचें राज्य, आत्मस्वातंत्र्य (कर्मसिद्धान्तापासून मुक्तता) व मानवाच्या अपूर्णत्वाची जाणीव या तत्त्वांच्या स्वीकारामुळेच व्यक्तीसाठी समाज का समाजासाठी व्यक्ति याबद्दल संदेह न राहतां 'व्यक्तीसाठी समाज' हा सिद्धान्त मान्य होऊं शकतो. लोकशाहीचें हें तितकेंच महत्त्वाचें तत्त्व आहे. दंड-सत्तावादी हे तत्त्व कदापि मान्य करीत नाहीत. राष्ट्रासाठी, समाजासाठी व्यक्ति असा त्यांचा सिद्धान्त असतो. त्यामुळे समाजहिताच्या नांवाखाली हजारो, लक्षावधि प्रजाजनांना ते खुशाल बळी देऊं शकतात. आणि हें समाजहित ठरवावयाचें कोणीं ? तर स्टॅलिन किंवा हिटलर यांनी ! त्यांची लहर हा कायदा असतो. मनु-याज्ञवल्क्यांप्रमाणे ते स्वतःला व त्यांचे अनुयायी त्यांना सर्वज्ञ, प्रमादातीत मानीत असतात. त्यांच्या ठायीं अपूर्णता असणें शक्यच नाही, असा त्यांच्या भक्तांचा दावा असतो. याच सिद्धान्तावर दंडसत्ता उभी असते आणि ती व्यक्तीला सर्व समाजयंत्रणेतला एक घटक असें मानीत असते.
 मानवसमाजाला हें तत्त्व अत्यंत घातक असतें. त्यामुळे लोकसत्तावादी त्याचा निक्षून निषेध करीत असतात. व्यक्तीचें सुख हें अंतिम उद्दिष्ट असून त्यासाठी समाजरचना करावयाची असते, असा त्यांचा सिद्धान्त असतो. व तो कायद्याचें राज्य, आत्मस्वातंत्र्य इत्यादि उपरिनिर्दिष्ट तत्त्वांच्या आधारें, तें प्रतिपादित असतात. समाजासाठी व्यक्तीने त्याग करावा, आत्मबलिदान करावें, त्यावांचून व्यक्ति जगू शकणार नाही, हें लोकसत्तावादी पंडितांना मान्य असतें. पण हें सर्व व्यक्तीने स्वतः स्वेच्छेने करावें अशी लोकशाहींत अपेक्षा असते. व्यक्तीचें बलिदान दुसऱ्या कोणी करावयाचें नाही; आणि करावयाचें असेलच तर तें कायद्याच्या सत्तेने केलें पाहिजे असा एवढा अर्थ 'व्यक्तीसाठी समाज' या तत्त्वांत अभिप्रेत असतो आणि तो सर्व लोकशाहीला अवश्य असतो. अंध धर्मसत्ता हा अर्थ कधीच मान्य करीत नाही; कारण ती सर्वज्ञ असते.
 भारतांतील वेदान्तदर्शन हें प्रत्येक व्यक्तीच्या ठायीं परमेश्वरी अंश आहे असें मानतें. हा सिद्धान्त व्यवहारांत, प्रत्यक्षांत आणला गेला असतां तर भारत हा लोकायत्त देशांचा अग्रणी झाला असता. पण प्रत्येक व्यक्तीच्या ठायीं चिदंश आहे, हें तत्त्व प्रतिपादणाऱ्या धर्मधुरीणांनीच लक्षावधि, कोट्यवधि लोकांना पापयोनि