पान:इहवादी शासन.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२ । इहवादी शासन
 

हा कर्मसिद्धान्त आता भारतांत जवळजवळ कोणीच मानीत नाही, असें म्हणण्यास कांही चिंता नाही. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय-सर्व क्षेत्रांतल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यास भारतीय जनता आता सिद्ध झाली आहे. ती त्या सिद्धान्तावरील श्रद्धा लोपल्यामुळेच होय. ती श्रद्धा लोपल्यामुळेच येथलें मनुष्यत्व मुक्त झालें आहे व लोकसत्ताक शासन पेलण्याचें सामर्थ्य त्याला लाभण्याची आशा वाटू लागली आहे.
 लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला विचार-उच्चार-आचाराचें जसें स्वातंत्र्य असतें तसेंच संघटन-स्वातंत्र्य असतें. म्हणजेच विरोधी पक्षालाहि सत्ताधारी पक्षाइतकीच मान्यता व प्रतिष्ठा असते. विरोधी पक्षाला मान्यता याचा अर्थ आपल्याइतकेंच दुसऱ्याचें मत, दुसऱ्याचा विचार, दुसऱ्याचा मार्ग हा बरोबर व यशोदायी असूं शकेल व आपले मत पूर्णपणे प्रामाणिक चुकीचें व भ्रांत असूं शकेल या विचार- सरणीला मान्यता असा होतो आणि फार मोठी मानसिक क्रांति झाल्यावांचून ही मान्यता देणें समाजाला शक्य नसतें.
 आपले मत, आपला पंथ, त्याचे सिद्धान्त हे पूर्णपणें किंवा अंशतः तरी चुकीचे असूं शकतील हा विचार धर्मशास्त्रकार त्रिकालदर्शी आहेत, त्यांना अंतर्ज्ञान आहे त्यांच्या मुखाने परमेश्वर बोलतो असें मानणारा समाज कधीहि स्वीकारणार नाही. प्राचीन काळी भारतांत परधर्म सहिष्णुता होती असे म्हणतात. होती हें खरें आहे. पण ती फार फार मर्यादित अर्थाने. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे परमार्थप्राप्ति करून घेण्याचा अधिकार आहे, असा त्या तत्त्वाचा अर्थ होतो. पण समाजांतील शूद्र, अंत्यज यांना हा अधिकार हिंदु धर्मशास्त्राने कधीहि दिला नव्हता. वेदाध्ययन, तप, यज्ञ यांचा अधिकार त्यांना नव्हता. तसें त्यांनी केल्यास त्यांना देहदंडाची शिक्षा शास्त्राने सांगितली होती. जातिभेद, चातुर्वर्ण्य, बालविवाह, विधवाविवाह, घटस्फोट या बाबतींत तें धर्मशास्त्र विरोधी पक्षावद्दल असेंच असहिष्णु होतें. त्यांतूनहि इ. स. १००० पर्यंत विरोधी विचार-आचारालाहि बराचसा अवसर होता. पण पुढल्या तमोयुगांत तो लुप्त होऊन सर्व समाज, प्रत्येक वर्ण, प्रत्येक जाति ही पूर्ण असहिष्णु बनली आणि जातिवर्णाचे अगदी सामान्य आचार-विचार, अत्यंत क्षुल्लक बाबतींत जरी उल्लंघिले गले तरी, नकळत उल्लंघिले गले तरी, अपराधी मनुष्याला बहिष्काराची भयानक शिक्षा भोगावी लागे. अशा स्थितीत विरोधी विचारसरणी- विरोधी तत्त्व यांना स्वमताइतकीच प्रतिष्ठा आहे, हें तत्त्व समाजाला मान्य होणें शक्यच नव्हतें. ही असहिष्णुता ख्रिस्ती समाजांतील विरोधी पक्षियांना जिवंत जळून मारीत असे ! मुस्लिम समाजांत त्यांना दगडांनी ठेचून मारीत असे आणि हिंदु समाज अशा लोकांना बहिष्कृत करून जन्मोजन्मीं मुस्लिम किंवा ख्रिस्ती होऊन राहण्याची शिक्षा देत असे.
 गेल्या शतकांत राममोहन राय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, ज्योतिबा फुले, दयानंद, आगरकर, कर्वे यांचा समाजाने खूप छळ केला आणि