पान:इहवादी शासन.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १७१
 

दैववादी, प्रतिकारशून्य झाला होता हें यावरून दिसून येतें. असे दुबळे, नीतिधैर्यहीन लोक लोकसत्ता स्थापूं शकत नाहीत.
 या कर्मसिद्धान्तांत आणखी एक हानिकारक गोष्ट अशी की, त्याची बंधनें तर्कशून्य असतात. आणि तर्कहीन, बुद्धिहीन बंधने मानवाच्या प्रतिष्ठेला बाधक ठरतात, हें मागे अनेक वेळा सांगितलें आहे. या जन्मीं एक माणूस सुखी तर एक दुःखी, एक गरीब तर एक श्रीमंत, एक बृहस्पति तर दुसरा बुद्धिहीन असें कां होतें, याचें कारण आपण सांगतों, अशी कर्मसिद्धान्ताची प्रौढी आहे. पण हें सर्व पूर्व- जन्मीच्या पाप-पुण्यामुळे होतें हें जें त्याचें उत्तर त्याला बुद्धिगम्य, तर्कसिद्ध, अनुभव- संपन्न असा कसलाहि पुरावा नाही. या जन्मीं, 'करावें तसें भरावें', या तत्त्वाप्रमाणे कधीच नियमाने कांही घडत नाही. विपरीतच अनेक वेळा घडतें. शिवाय प्रथमच, मुळारंभीं मानव जन्माला आला तेव्हा पूर्वकर्म संभवत नसल्यामुळे, तेथे भेदाभेद कां झाला, याला कर्मवादाजवळ उत्तर नाही.
 असें असल्यामुळे कर्मवादाच्या आधारे घातलेली समाजबंधने हीं मानवी प्रज्ञेला, न्या. रानडे यांनी म्हटल्याप्रमाणे, हानिकारकच ठरणार. मानवत्वाची प्रतिष्ठा हें तर लोकशाहीचें आद्य तत्त्व होय. त्यालाच बाधा करणारा कर्मसिद्धान्त समाजमनांतून नष्ट झाल्यावांचून लोकशाही यशस्वी होणें कांलत्रयीं शक्य नाही.
 गेल्या शतकाच्या उत्तरार्धात रानडे, दयानंद, विवेकानंद, टिळक इत्यादि थोर पुरुषांनी बुद्धिवाद, प्रवृत्तिवाद, परिवर्तनशीलता, मानवत्वाची प्रतिष्ठा इत्यादि धर्मक्रांतीची तत्त्वें मान्य करून धर्मसुधारणेचें तत्त्व अंगीकारलें तेव्हा कर्म- सिद्धान्ताची ही काळमिठी सुटली आणि लोकशाहीला अवश्य ती मनोवृत्ति भारतांत निर्माण होऊ लागली. कर्मसिद्धान्तच या धर्मधुरीणांनी अमान्य केला असें नव्हे. पण त्याच्या अनुषंगाने येणारें दैववादाचें, जातिभेदाचें, विषमतेचें तत्त्वज्ञान मात्र त्यांनी समूळ खंडून टाकलें. दीनदलित, शूद्र, अंत्यज हे पूर्वकर्मामुळे त्या पायपयोनींत जन्मले असून या जन्मी त्यांनी श्रेष्ठ वर्णाची सेवाच केली पाहिजे व त्या पुण्याईने ते पुढील जन्मीं श्रेष्ठ जातीत जन्माला येतील तेव्हा त्यांना समाजांत उच्च प्रतिष्ठा प्राप्त होईल या जुन्या धर्मशास्त्राच्या विचाराला त्यांनी क्षणभरहि थारा दिला नाही. तसें असतें तर त्यांच्याशी बंधुत्वाचे नाते सांगून, त्यांनाच परमेश्वर मानून या थोर पुरुषांनी त्यांच्या सेवेला वाहून घेतलेच नसतें !

मुक्त मनुष्यत्व

 तेव्हा मानवी संसाराचें तात्त्विक चिंतन करतांना कर्मसिद्धान्त कोणी मानतो की नाही याला महत्त्व नसून त्यावरून प्राचीन धर्मशास्त्राने सांगितलेले व्यावहारिक विचार लोक मानतात की काय व ते कितपत मानतात याला महत्त्व आहे. आणि त्या दृष्टीने पाहतां प्राचीन धर्मशास्त्राचा समाजाला अत्यंत घातक असा