पान:इहवादी शासन.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७० । इहवादी शासन
 

जन्म आला तर तो गेल्या जन्मीच्या, पापकर्मामुळे आला, असा मनाचा निश्चित ग्रह झाल्यावर या जन्मीं कपाळी येणारा नरकवास मुकाट्याने भोगण्याखेरीज गत्यंतर नाही, अशी मनाची वृत्ति अपरिहार्यपणेंच होते आणि ती झाल्यावर अन्यायाचा प्रतिकार करण्यास अवश्य ती मनाची रंग, तें मनोवल, तें नीतिधैर्य कोठून येणार ?
 या जन्मीं पुण्य करून पुढील जन्मीचा नरकवास टाळावा असें कोणाच्या मनांत येईल कदाचित्, पण तेंहि शक्य नाही. कारण 'बुद्धिः कर्मानुसारिणी !' पुण्य करण्याची या जन्मीं बुद्धि होणें हेंहि मागल्या जन्मीच्या कर्मावरच अवलंबून असतें. शिवाय वेदान्त ज्ञान मिळवून तपःसाधना करून मागल्या कर्माचें बंधन तोडावें असें हीन जातियांच्या मनांत आलें तरी उपयोग नाही; कारण तो मार्ग अनुसरण्यास त्याना धर्मशास्त्राची मनाई आहे. शूद्राला धर्म नाहीच, असा त्या धर्मशास्त्राचा सिद्धान्त आहे. दैववादाने अशी करकचून बांधून टाकलेली जनता अन्यायाचा प्रतिकार कसला करणार ?
 भारताचें आणखी दुर्दैव असे की, हा कर्मसिद्धान्त येथील सर्व धर्म-पंथांनी स्वीकारलेला होता. बुद्ध, महावीर हे वैदिक धर्माविरुद्ध बंड करून उठले होते. ते निरीश्वरवादी होते. गौतमबुद्धाला तर आत्माहि मान्य नव्हता. तरीहि कर्मवादापुढे त्यांनी मान लवविली होती. न्याय, सांख्य हीं नास्तिक दर्शनें होत; पण त्यांनीहि कर्मसिद्धान्त मानलेला होता. अशा रीतीने कर्मवादाची किंवा दैववादाची सत्ता प्राचीन काळापासून सर्वंकष, सर्वगामी व अप्रतिहत अशी होती. अशा समाजांत अन्यायाला, असत्याला आव्हान देऊन सर्व विश्वाविरुद्ध एकट्या एकपणे लढा देण्यास उभे राहण्याइतकें समर्थ व्यक्तित्व एकाहि पुरुषाच्या ठायीं निर्माण झाले नसले; तर त्यांत नवल काय ?

प्रतिकारशून्य समाज

 वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांसारख्या ब्राह्मण ज्योतिषशास्त्रज्ञांना प्रत्यक्ष अवलोकनाने सिद्ध झालेलें, गणितशास्त्राने मान्यता दिलेलें, सूर्य-चंद्राच्या ग्रहणाविषयीचें सत्य ठामपणे समाजाला सांगण्याचें व लोकांची पुराणोद्भव भ्रांति दूर करण्याचें धैर्य झालें नाही. "यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नादरणीयं नाचरणीयम्" हाच भेकड पाठ ते घोकीत बसले होते. त्या काळांत मधून मधून शूद्रजातीय पुरुष राजपदावर आरूढ होत. पण त्यांनीहि शूद्र जातीवर अन्याय करणारें धर्मशास्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. सत्ता हातीं असतांनाहि स्वसमाज संघटित करून त्याच्यावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाचा प्रतिकार करण्याचे त्यांनी मनांतहि आणलें नाही. तेव्हा शूद्र-अंत्यजादि सामान्य जनता त्या प्रतिकारासाठी उभी ठाकली नाही यांत काय आश्चर्य ? कर्मसिद्धान्तामुळे अखिल भारतीय समाजच कसा दुबळा,