पान:इहवादी शासन.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १६९
 

हिंदूंसाठी! मुस्लिमांना त्यांनी त्यांतून वगळलें! श्रीमंत व गरीब, मंत्री व सामान्य जन यांना प्रत्यक्षांत भिन्न कायदा नाही; पण आपल्या परिजनांना न्यायपीठापासून अलग ठेवण्याची कसोशी पंडितजी करीत असत. अप्रत्यक्षपणें ही विषम दंडनीतीच होय. तीच भारताला घातक ठरली आहे.
 कायद्याचें राज्य, सर्वांना समदंडनीति (कायदा) हें जसें लोकसत्तेचें एक प्रधान तत्त्व आहे त्याचप्रमाणे असा कायदा बाजूस ठेवून, त्याची अवहेलना करून कोणी अन्याय करूं लागला, तर त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क असणें, हेंहि महत्त्वाचें तत्त्व आहे. भारताच्या प्राचीन इतिहासांत हें फार मोठें वैगुण्य दिसून येतें. जनतेने अन्यायाचा प्रतिकार करणें, हें भारतीय समाजाला ठाऊकच नाही. सुवर्णयुग संबोधिलेल्या प्राचीन कालखंडांतहि वर निर्देशिलेली विषम दंडनीति होती.
 तमोयुगांतल्याप्रमाणे तिला पराकाष्ठेचें तीव्र रूप आलें नव्हतें हें खरें; पण शूद्र, अंत्यज यांना जीवन असह्य व्हावें अशी स्थिति अनेक ठिकाणीं निश्चितच होती. ब्राह्मण हा कितीहि हीन असला, तरी त्याला वंद्य मानले पाहिजे, असा एक विचारप्रवाह त्या काळांतहि होताच. वेदविद्या व इतर भौतिक विद्या यांपासून कनिष्ठ जातीय समाज वंचितच होता. व्यवसायबंधनें त्याच्यावर होतीच. धनसंग्रहाची त्याला बंदी होती. इ. स. १००० नंतरच्या तमोयुगांत तर हीं बंधनें पराकोटीला जाऊन त्याचें जीवन नरकप्राय झालें. तरीहि शुद्र, अस्पृश्य यांपैकी एकहि व्यक्ति किंवा जाति या अन्यायाचा प्रतिकार करण्यास कधी उसळून उठली नाही! आम्ही वाटेल त्या जलाशयावर पाणी भरणार, वाटेल त्या देवळांत प्रवेश करणार, हव्या त्या विद्येचा अभ्यास आम्ही करूं व हवा तो व्यवसाय करूं, अशी जिद्द मनांत बाळगून त्यासाठी प्राणपणाने संग्राम करण्याचें नीतिधैर्य, तें आत्मबल, येथे कोणीहि प्रकट केलें नाही, हें भारताचें अत्यंत मोठे दुर्दैव होय. अशा आत्मबलावांचून, लोकशाही लांबच राहिली. पण समाजाची कोणतीहि प्रगति होणें शक्य नसतें.

आत्मबलाचा अभाव

 या आत्मबलाचा संपूर्ण अभाव या समाजांत असण्याचें कारण काय? भारतीय तत्त्वज्ञानांतील कर्मसिद्धान्त हें त्याचें कारण होय. या जन्मीं मनुष्याला जें कांही सुखदुःख मिळावयाचें, त्याचा जो उत्कर्षापकर्ष व्हावयाचा तो पूर्वजन्मींच्या कर्मानुसार होत असतो, या जन्मीचें त्याचें सर्वचरित्र, भवितव्य गतजन्मीच्या कर्मानी निश्चित होत असतें, असा हा सिद्धान्त आहे. कर्मतत्त्व किंवा कर्मवाद तो हाच. यालाच दैववाद असें म्हणतात. या कर्मवादामुळे मनुष्याच्या कर्तृत्वाची सर्व उभारीच नष्ट होते. शूद्र किंवा अंत्यज या पापयोनींत