पान:इहवादी शासन.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ५
 

केली होती. पण शेवटीं त्याने धर्माची महती गाऊन विशुद्ध बुद्धिवादी परिवर्तनशील, धर्माची आवश्यकता प्रतिपादिली होती. तरी त्याची प्रतिगामी म्हणून संभावना करून भांडवलशाहीला गरिबांच्या शोषणांत तो साह्यच करीत आहे, असा त्याला लेनिनने ठपका दिला.

धर्मतत्त्वापुढे शरण

 धर्माविषयी अशीं आत्यंतिक कडवीं मतें असल्यामुळेच कम्युनिस्टांनी सत्ता हातीं येतांच, प्रारंभीं सांगितल्याप्रमाणे धर्माचें अगदी निर्दालन करण्याचा अघोरी प्रयत्न केला. वीस-बावीस वर्षे त्यांना बाह्यतः यश आल्यासारखें दिसलेंहि, पण हिटलरचें आक्रमण झालें व सर्वनाश डोळ्यांसमोर दिसूं लागला तेव्हा मार्क्स, एंगल्स, लेनिन यांचे धर्मविरोधी तत्त्वज्ञान सर्व गुंडाळून ठेवून त्यांना धर्मतत्त्वाला शरण जावें लागलें.
 मॉरिस् हिंडस् याने 'मदर रशिया' या आपल्या पुस्तकांत हें परिवर्तन कां व कसें झालें, याचें तपशिलाने वर्णन दिले आहे. सार्वजनिक जीवनांत, शासकीय व्यवहारांत धर्माला, पूजेला, प्रार्थनेला कोणतेंहि स्थान असतां कामा नये, असा एक पक्ष भारतांतले इहवादी विचारवंत मांडीत असतात. त्यांनी रशियांतल्या गेल्या पन्नास वर्षांतल्या धर्मविचारांतील परिवर्तनांचा इतिहास अभ्यासणें अवश्य आहे, असें वाटतें.
 धर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ति व प्राचीन परंपरेचा अभिमान या मानवाला स्फूर्ति व बळ देणाऱ्या गोष्टी कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाने अत्यंत निंद्य व त्याज्य मानल्या आहेत. धर्माबद्दल वर लिहिलेच आहे. राष्ट्राविषयी मार्क्सवादाचें तेच मत आहे. हा भांडवलदारांनी निर्माण केलेला भेद आहे, असें मार्क्स म्हणतो. परंपरेचा अभिमान हीहि अत्यंत प्रतिगामी क्रांतिविरोधी वृत्ति आहे, असें त्याचें मत आहे. रशियाचा इतिहास १९१७ पासून म्हणजे कम्युनिस्ट क्रांतीपासून सुरू होतो, असें सोव्हिएट नेते प्रारंभीं सांगत असत व शाळांत मुलांना तसें शिकवीत असत. पण युद्धाचें आव्हान येतांच या प्रेरणावांचून जनतेला अंतिम त्यागाची स्फूर्ति मिळतच नाही, असें त्यांच्या ध्यानांत आलें व मग एकदम पलट खाऊन त्यांनी या प्रेरणांची उपासना सुरू केली. या प्रेरणा म्हणजे अफू नसून प्राणवायु आहे, असें ते सांगूं लागले.
 धर्मविरोधी प्रचार सर्व बंद झाला. शेकडो धर्मगुरूंना तुरुंगांतून मुक्त करण्यांत आलें. 'मिलिटंट अथेइस्ट असोसिएशन' ही पाखंड संस्था नष्ट करण्यांत आली. आणि लोकांच्या धर्मनिष्ठेला नाना प्रकारें आवाहन करण्यांत येऊ लागलें. विजयासाठी सार्वजनिक रीतीने जाहीर प्रार्थना होऊं लागल्या, अडीच कोटि रुबलचा निधि चर्चला देण्यांत आला. 'दि ट्रूथ अबाउट रिलिजन इन् दि सोव्हिएट युनियन' हा ग्रंथ स्टॅलिन-आज्ञेने लिहवून घेऊन, त्याच्या पन्नास हजार