पान:इहवादी शासन.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १६७
 

परंपरा या महापुरुषांच्या रूपाने गेल्या शतकांत भारतीयांना लाभली म्हणूनच भारत हें जंबुद्वीप राष्ट्र- पदवीला पोचूं शकलें.


 अंध, शब्दप्रामाण्यवादी, अपरिवर्तनीय धर्माची सर्वंकष सत्ता नष्ट होऊन इहवादाचा येथल्या धर्मधुरीणांनी गेल्या शतकांत आश्रय केला म्हणूनच भारतांत राष्ट्रधर्माचा उदय होऊ शकला व येथल्या नेत्यांना राष्ट्रसंघटना करता आली, हें आपण गेल्या लेखांत पाहिले. आता त्याच इहवादी तत्त्वज्ञानामुळे आपण भारतांत लोकायत्त शासन, प्रजातंत्र वा प्रजासत्ताक कसें स्थापूं शकलों, अन्यथा तें सर्वस्वीं कसें अशक्य होतें तें पाहवयाचें आहे.
 मानवत्वाची प्रतिष्ठा, समता, सामूहिक चिंतन आदि जीं तत्त्वें राष्ट्ररचनेला अवश्य म्हणून वर सांगितलीं आहेत तीं तर लोकशाहीला आवश्यक आहेतच, पण शिवाय आणखीहि कांही तत्त्वांचा लोकायत्त शासन-निर्मितीसाठी अवलंब करावा लागतो. त्याच तत्त्वांचें विवरण या लेखांत करावयाचें आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट आपण ध्यानांत वागविली पाहिजे की, राष्ट्रनिष्ठा व लोकशाहीनिष्ठा या अविभाज्य नाहीत.
 आज सोव्हिएट रशिया, चीन, युगोस्लाव्हिया इत्यादि साम्यवादी देशांत राष्ट्रनिष्ठा उत्कट रूपांत दिसते. पण तेथे लोकशाहीचा वासहि नाही. दुसऱ्या महायुद्धापूर्वी इटली, जर्मनी, या राष्ट्रांची तीच स्थिति होती. इंग्लंड, फ्रान्स हे देश चौदाव्या-पंधराव्या शतकांतच राष्ट्र- पदवीला पोचलें होतें. पण तरीहि तेथे लोकशासन त्या वेळीं नव्हतें. भारतांत मात्र या दोन्ही निष्ठांची जोपासना गेल्या शतकांत एकदमच सुरू झाली. म्हणून त्यांच्या मागची तत्त्वें अभिन्न आहेत असें वाटण्याचा संभव आहे; पण तसें नाही, हें आपण जागरूकपणें लक्षांत ठेवलें पाहिजे. राष्ट्र-धर्माच्या तत्त्वज्ञानांत लोकशासनाचीं सूक्ष्म बीजें असतात व त्यांतूनच लोकशाहीचा उदय होतो हें खरें; पण हें सर्वत्र घडतेंच असें नाही. म्हणूनच आपण सावधपणे विचार केला पाहिजे.

महत्त्वाचं तत्त्व

 बुद्धिस्वातंत्र्य, व्यक्तिवाद, परिवर्तनशीलता, विवेकनिष्ठा आदि लोकशाहीच्या आद्य तत्त्वांचा आणि मानवत्वाची प्रतिष्ठा, समता इत्यादि तत्त्वांचा विचार आपण मागे केला आहे याशिवाय लोकशाहीचें राहिलेलें महत्त्वाचें तत्त्व म्हणजे 'कायद्याचें राज्य' हें होय. राजसत्तेमध्ये किंवा दंडसत्तेमध्ये कायदे केलेले असले तरी शासन हे सर्वस्वी राजाच्या किंवा दंडधराच्या लहरीवर असतें. त्यामुळे जीवितवित्ताची