पान:इहवादी शासन.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६ । इहवादी शासन
 

ऐहिक विषयांच्या अभ्यासक्रमांतून जाऊं लागला. इंग्लंडचा इतिहास, भारताचा इतिहास, मिल मोर्ले, स्पेन्सर, कार्लाइल यांचें तत्त्वज्ञान, फ्रेंच क्रांतीचें, अमेरिकन क्रांतीचें तत्त्वज्ञान, शेक्सपियर, मिल्टन, डिकन्स, कालिदास, भवभूति यांचें साहित्य, ॲडम स्मिथ, रिकार्डो यांचें अर्थशास्त्र, युक्लिड, न्यूटन यांचे गणित, डेव्हिस, फॅराडे यांचें विज्ञान, यांचेच संस्कार सर्वांवर सतत झाल्यामुळे अखिल भारतीय जनतेच्या मनांत देशभक्ति, समता, स्वातंत्र्य, सर्व धर्म-समानत्व, स्त्रीची दास्यविमुक्ति, गुणसिद्ध योग्यता, मानवता, अशीं समानमूल्यें निर्माण झाली.
 तमोयुगांत भारतांत शिक्षणच नव्हतें ! खेड्यांतले तात्या पंतोजी काय अक्षर- ओळख, हिशेबठिशेब शिकवतील तेवढेच. ब्राह्मणांच्या कांही पाठशाळा असत; पण तेथे समाजाशी संबंध मुळीच नाहीं अशा विद्यांचें अध्यापन होत असे. वरील विद्यांपैकी तेथे कांही नव्हतें, आणि जें होतें तें सर्वांना शिकवावयाचें नव्हतें. त्यामुळे समूहमन येथे कधी निर्माण झालें नाही. आणि तें नाही म्हणजे राष्ट्रभावना नाही. पण आता शाळा-महाशाळांतून या मनाची घडण होऊं लागली.
 अखिल भारतांत दिल्या जाणाऱ्या या एकरूप शिक्षणांतूनच वर निर्देशिलेले महापुरुष निर्माण होऊन सर्व समाजाला, अखिल भारतीय जनतेला, चांभार, मांग, साळी, माळी, कोष्टी, परीट, न्हावी, कुंभार, लोहार या सर्वांना जिच्यावर हक्क सांगतां येईल अशी एक समाईक परंपरा भारतांत निर्माण झाली. वर सांगितलेंच आहे की, अशी परंपरा हे राष्ट्राचें स्फूर्तिस्थान असतें, पराक्रमाची ती प्रेरणा असते. त्या अभिमानावांचून समाजाच्या अंगांत जीवन-संचार होत नाही, चैतन्य येत नाही. भारताची प्राचीन परंपरा फार थोर आहे. सर्व वर्णांना, जातींना हक्क सांगतां येईल अशी ती आहे. पण तमोयुगांतल्या अधर्मशास्त्राने बहुतेक सर्व जातींना तिच्यापासून तोडून टाकलें होतें आणि इतिहास-लेखनाच्या अभावामुळे त्या परंपरेचें स्मरण सतत जागृत ठेवणारी दुसरी पीठिका भारतांत नव्हती. त्यामुळे जनतेचें आत्मज्ञानच लोपलें.
 नव्या विद्येमुळे एक तर त्या आत्मज्ञानाचें उज्जीवन झालें आणि दुसरें म्हणजे एक नवीं समाईक परंपरा निर्माण झाली. या आर्वाचीन परंपरेतील महापुरुषांना अखिल भारतीय जनतेची चिंता होती, या सर्व जनतेला ते आपली मानत असत, तिच्यासाठीच ते जगत असत, हें त्यांच्या वाणींतून, लेखणींतून, कृतींतून, पावलो- पावलीं प्रत्ययास येत होतें. "अखिल मानवतेचें सुखसंवर्धन हें आगरकरांचे ध्येय होतें. टिळक 'तेल्यातांबोळ्यांचे’ पुढारी होते. 'हिंदुस्थानवासी' हेंच बंधुत्वाचें नातें ते सांगत. स्वामी विवेकानंद, "गरीब जनता म्हणजेच परमेश्वर" असें मानीत व तिची सेवा करतांना मला नरकवास आला तरी मी तो पत्करीन, असें म्हणत. महात्माजी म्हणजे जनतेचेंच मूर्त रूप. सावरकर, आंबेडकर, पंडितजी, सुभाषचंद्र, राजेंद्रबाबू असेच भारताशी एकरूप झालेले होते. राष्ट्ररचनेला अवश्य असलेली