पान:इहवादी शासन.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १६५
 

सर्वसंग्राहक, समान ध्येय प्राप्त करून दिलें. त्यासाठी त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या व त्यांत होणाऱ्या विचारविनिमयांतून भारताला एक सामूहिक मन निर्माण झालें आणि तें भारताची चिंता करूं लागलें.
 भारताची आर्थिक लूट होत आहे, इंग्रज सरकार हे नित्य द्रव्यशोष करीत आहे, हें दादाभाईंनी सांगितलें. दारिद्र्याचा हा प्रश्न भारताच्या पुढील राजकारणांत प्रत्येकाच्या चिंतेचा विषय होऊन बसला होता. रानडे, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, लजपतराय, आगरकर, टिळक, महात्माजी, नेहरू यांसारखे सर्व नेते या प्रश्नाला अग्रस्थान देत सामूहिक मन याचा हा अर्थ आहे. या सामूहिक मनांत निर्माण होणाऱ्या विचारांना निश्चित आकार देणारी संस्था म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रसभा ही होय.
 भारताच्या मागल्या इतिहासांत अशी अखिल भारतीय सभा केव्हाच निर्माण झाली नव्हती. कारण हिंदु, ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी अशा सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र येऊन करण्याजोगें कार्यच कांही त्यांना दिसलें नव्हतें; आणि दिसलें असतें तरी त्यांना सोवळ्याओवळ्यामुळे एकत्र येतां आलें नसतें. त्यांची जात बाटली असती. पंचहौद मिशन प्रकरणी ती वेळ आलीच होती. चार- एक वर्षांपूर्वी येथे विश्वहिंदु परिषद् स्थापन झाली आहे. ती तर केवळ हिंदूंची सभा आहे. त्याच वेळी माझ्या मनांत प्रश्न आला की, अशी अखिल हिंदूंची परिषद् भारताच्या इतिहासांत पूर्वी कां झाली नाही ? धर्मशास्त्राच्या प्रभावामुळे तशी परिषद् भरविणें अशक्य होतें, एका व्यासपीठावर अखिल हिंदूंना आणण्याला हिंदुधर्मशास्त्राचाच विरोध होता, हें त्याचें उत्तर आहे.

सामूहिक मनाचे चिंतन

 काँग्रेस ही सामूहिक मन निर्माण करणारी सभा त्या धर्मशास्त्राची सर्वंकष सत्ता नष्ट झाल्यामुळेच निर्माण होऊ शकली. काँग्रेसप्रमाणेच अखिल भारताचे सामाजिक प्रश्न चर्चिणारी सामाजिक परिषद्, विज्ञानाचा विचार करणारी विज्ञान परिषद् इतिहास परिषद्, प्राच्यविद्या परिषद्, तत्त्वज्ञान परिषद् अशा अखिल भारतीय परिषदा निर्माण झाल्या. त्या परिषदा राजेमहाराजे, सरंजामदार, जहागीरदार, सरदार, धर्मपीठाधिष्ठित आचार्य यांच्या नव्हत्या. त्या सामान्य माणसांच्या होत्या, जनतेच्या होत्या. प्रत्येक व्यक्ति आता देशाच्या उत्कर्षापकर्षाची चिंता वाहण्यास सिद्ध झाली याचेंच हे द्योतक होय. म्हणजे या देशांत आता व्यक्ति निर्माण झाल्या व त्या सामूहिक ध्येयाने प्रेरित होऊन सामूहिक मनाने चिंतन करूं लागल्या. पूर्वी हें मनहि नव्हतें.
 अखिल भारतांत इंग्रज सरकारने स्थापन केलेल्या शिक्षणसंस्था, शाळा, महाशाळा यांनी सामूहिक मन निर्माण होण्यास फार साह्य झालें. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक प्रदेशांतल्या शाळा-महाशाळांतला प्रत्येक विद्यार्थी एकाच