पान:इहवादी शासन.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४ । इहवादी शासन
 

तरी ज्यांना जबर शिक्षा करावी असें धर्मशास्त्र सांगतें त्यांना वेदांचा अभिमान वाटणें कसें शक्य आहे ? प्राचीन इतिहासापासून स्फूर्ति कां मिळते. त्या इतिहासांतले पराक्रम ज्यांनी केले त्यांचेच रक्त माझ्या अंगांत आहे, त्यांचाच मी वारस आहें, ते पराक्रम माझेच पूर्वीचे पराक्रम आहेत, असा हंकार वाटून व्यक्तीला आत्मविश्वास निर्माण होतो, मला पुन्हा तसा पराक्रम करणें पूर्ण शक्य आहे अशी तिच्या मनाची निश्चिति होते म्हणून.
 भारताच्या प्राचीन इतिहासापासून सर्व हिंदूंना अशी स्फूर्ति मिळेल काय ? पाणिनी, पतंजली, कपिल, कणाद, कुमारिलभट्ट, शंकराचार्य, मनु, याज्ञवल्क्य यांची प्रज्ञा, बुद्धिमत्ता, प्रतिभा म्हणजे आपलीच प्रतिभा होय, त्यांचे कर्तृत्व तें माझेंच कर्तृत्व होय असा शूद्रांना, अंत्यजांना आंतून हुंकार येईल काय ? आज चोखामेळा, नामदेव, सावता माळी यांचा अभिमान धरून त्या त्या जातीचे लोक मंदिरें बांधीत आहेत, संस्था स्थापित आहेत हें कशाचें द्योतक आहे ? चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, कालिदास, ज्ञानेश्वर हे पुरुष त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हें त्या लोकांनाहि बहुधा मान्य होईल. पण कर्तृत्वाची स्फूर्ति त्यांच्या स्वजातीय पूर्वजांच्या कर्तृत्वामुळे जास्त येईल, यांत शंकाच नाही. शिवाय चंद्रगुप्त, कालिदासादि पुरुष आमच्याच रक्ताचे होते असा दावा त्यांनी सांगितला, तर वरिष्ठ समाज तो फेटाळून टाकील. मग समान इतिहास, एक-परंपरा म्हणजे काय ?
 असा इतिहास, अशी परंपरा असतांच कामा नये अशी व्यवस्था मनु-याज्ञवल्क्य आदि धर्मशास्त्रज्ञांनी करून टाकलेली आहे, समाजघातक असे भेदाभेद माजविणारें हें धर्मशास्त्र धिक्कारून वेदरचनेचें श्रेय ब्राह्मण-क्षत्रियांप्रमाणे स्त्री-शूद्रांनाहि आहे, त्या प्राचीन काळीं आविक्षित मरुत्त, चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, वेदव्यास या शूद्र रक्ताच्या पुरुषांनीहि थोर पुरुषार्थ केले आहेत; तेव्हा भारताची प्राचीन परंपरा ही सर्वांची आहे, त्या वैभवाचें श्रेय सर्वांना आहे, ही संस्कृति आर्यांप्रमाणेच द्रविडांची, अनार्यांची, असुरांची, नागांचीहि आहे, ब्राह्मणांप्रमाणेच शूद्रांचीहि आहे हें इतिहास- चिकित्सेंतून निघणारे निष्कर्ष समाजांतल्या सर्व थरांना दाखवून दिले, तरच राष्ट्र- रचनेला अवश्य तीं स्फूर्तिस्थानें पुनरुज्जीवित होतील. गेल्या शतकांत अशा तऱ्हेचे प्रयत्न सुरू झाले होते. एक परंपरेचा पाया घातला जात होता म्हणूनच येथे राष्ट्राचें मंदिर उभारणें शक्य झालें. तमोयुगांतील रूढ धर्मशास्त्रालाच आपण कवटाळून बसलों असतो, तर तें कदापि शक्य झालें नसतें.
 पण सुदैवाने तसें झालें नाही. तमोयुगांतील धर्माच्या नांवाखाली चालणारा तो अधर्म राममोहन राय, रानडे, दयानंद, आगरकर, विवेकानंद, टिळक, महात्माजी या थोर पुरुषांनी नष्ट करून टाकला. येथल्या मानवाच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ज्यांना त्या अधर्मशास्त्राने पापयोनि म्हटलें होतें त्यांची अस्मिता जागृत केली आणि सर्व समाजाला एका पातळीवर आणून त्याला देशभक्ति, स्वातंत्र्य, हें