पान:इहवादी शासन.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १६३
 

एक ध्येय, एक उद्दिष्ट असणें अशक्य करून ठेवलें होतें. सर्व देशांत एक ध्येय निर्माण होण्यासाठी त्या समाजांतील सर्व थरांतले, सर्व वर्गांतले, सर्व जातींतले लोक नित्य एकत्र येणें अवश्य असतें. पण तसे ते कधीहि येतां कामा नयेत, असें हिंदु धर्माचें शास्त्र होतें. चर्चमध्ये सर्व ख्रिश्चन एकत्र येतात, मशिदींत सर्व मुस्लिम एकत्र जमतात, तसे एका देवळांत सर्व हिंदु एकत्र जमूं शकत नाहीत. त्यांनी नाहीच जमावयाचें असा हिंदुधर्म (किंवा अधर्म) आहे. हिंदु देवळांत जमूं शकत नाही, भोजनासाठी नाही, व्यवसायासाठी नाही.
 राजाराजांमध्ये लढाया चालू असतांना शेतकरी शांतपणे शेतीचा उद्योग करीत असत, असें भारताचें भूषण म्हणून कांही इतिहासकार सांगतात. तेव्हा देशाचें संरक्षण हेंहि सामूहिक ध्येय होतें असें नाही. बाराव्या-तेराव्या शतकापासून इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, पोलिश लोक युद्धाला जात ते इंग्लिश म्हणून, फ्रेंच, जर्मन म्हणून जात. त्याच्या आधी ख्रिश्चन म्हणून जात. त्याच्याहि आधी ग्रीक म्हणून, रोमन म्हणून जात. अशी सामुदायिक संरक्षणाची भावना, समान उद्दिष्ट, समान ध्येय हिंदु समाजांत कधीहि नव्हतें. तसें नसलेंच पाहिजे, असें धर्मशास्त्र होतें. "मराठा तितुका मिळवावा" अशी एक सांघिक भावना समर्थांनी व शिवप्रभूंनी महाराष्ट्रांत निर्माण केली होती. ती फार काळ प्रभावी नव्हती, तरी तेवढ्या समान ध्येयाच्या बळावर मराठ्यांनी सर्व हिंदुस्थान मुक्त केला. पण अन्य प्रांतांत असें समायिक ध्येय कधीहि निर्माण झालें नाही. अखिल हिंदुसमाजांत तर कधीच नाही.
 'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा' या आपल्या ग्रंथांत रघुनाथशास्त्री कोकजे यांनी या सामूहिक, सर्वसंग्राहक ध्येयाच्या अभावाचें फार उत्कृष्ट विवेचन केलें आहे. सोवळ्या-ओवळ्याच्या, अतिरिक्त पावित्र्याच्या कल्पना हेंच या अभावाचें प्रमुख कारण त्यांनी दिलें आहे. एकमेकांना पापयोनी समजणाऱ्या जाति एका ध्येयाने प्रेरित होणें कधीच शक्य नसतें. याच्या जोडीला संन्यासवाद व भागवतांचा भक्ति- मार्ग यांनी वैयक्तिक मोक्षाचें ध्येय लोकांना उपदेशिल्यामुळे सामूहिक उद्दिष्टाचा संभव अजीबात नष्ट झाला. आपल्या बायकामुलांच्या, आप्तेष्टांच्या योगक्षेमाचीसुद्धा चिंता करूं नये, अशी वृत्ति जोपासणारा समाज राष्ट्राच्या योगक्षेमाची चिंता कशी वाहणार ? राष्ट्रीय योगक्षेमाची चिंता प्रत्येक व्यक्तीने वाहिली पाहिजे ही तर राष्ट्रसंघटनेची पहिली अट आहे.

प्रेरणेची गरज

 समान ध्येय, समान उद्दिष्ट याप्रमाणेच समान पूर्वपरंपरा, समान इतिहास, समान प्राचीन वैभवाचा अभिमान यांतून मिळणारी स्फूर्ति, प्रेरणा ही राष्ट्रसंघटनेला अवश्य असते. बायबल किंवा कुराण यांचा ख्रिश्चन किंवा मुस्लिमांना जसा अभिमान वाटतो तसा वेदांचा अभिमान अखिल हिंदूंना वाटेल काय ? वेद नुसते कानांनी ऐकले