पान:इहवादी शासन.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२ । इहवादी शासन
 

समाजांत नव्वद पंचाण्णव टक्के लोक शूद्र झाले, पापयोनि झाले. असा हा समाज राष्ट्र घडवू शकत नाही.

अस्मितेची हत्या

 शब्दप्रामाण्याने मानवाच्या बुद्धीची हत्या होते, तर पापयोनित्वाच्या शिक्क्यामुळे त्याच्या अस्मितेचीच हत्या होते. अस्मिताशून्य माणसें राष्ट्रनिर्मिति करूं शकत नाहीत. राष्ट्र हे व्यक्तींचें असतें, नागरिकांचें असतें, मुक्त मनुष्यांचें असतें. म्हणजे ज्यांच्या मनाला कांही रंग आहे, बल आहे, सामर्थ्य आहे, तेज आहे अशांचें असतें. अशीच माणसें समाजाचें चिंतन करूं शकतात. शिरावर कांही जबाबदारी घेऊ शकतात. आत्मबलिदान करूनहि अन्यायाचा प्रतिकार करण्याचें नीतिधैर्य त्यांच्याच ठायीं असूं शकते. पण सर्व समाजालाच पापयोनि ठरवून धर्मशास्त्रज्ञांनी समाजाचें, मानवी मनाचें हें सामर्थ्य नष्ट करून टाकलें होतें; आणि ते धर्मशास्त्रज्ञ ज्ञानहीन विद्याहीन व दृष्टिशून्य असल्यामुळे ते स्वतःहि पापयोनीच झाले होते. सर्व समाजाला पापयोनि ठरवून अखिल मानवाची हत्या करणें यापेक्षा भयंकर पाप तरी कोणतें असतें ?
 व्यक्तिहीन, अस्मिताशून्य मानवांचा समाज ज्याप्रमाणे राष्ट्र घडवू शकत नाही त्याचप्रमाणे अत्यंत विषम समाज, अमंगळ भेदाभेद मानणाऱ्या मानवांचा समाजहि राष्ट्र घडवू शकत नाही. राष्ट्र हें संघटनातत्त्व आहे. संघटित समाजच राष्ट्र- पदवीला जाऊं शकतो. पण संघटनेला समता अवश्य असते. "साम्याद् हि सख्यं भवति, वैषम्यान् नोपपद्यते" हें व्यास-वचन प्रसिद्धच आहे. पण समाजाचें हें साम्य हिंदुधर्मशास्त्राने जाणूनबुजून नष्ट करून टाकलें होतें. दुर्दैव असे की, धर्मशास्त्रज्ञांची ही वृत्ति प्रत्येक जातींत भिनल्यामुळे येथे प्रत्येक जात दुसऱ्या जातीला हलकी मानूं लागली होती. समाजांतील चार-पांच टवके ब्राह्मण एका बाजूला व बाकी सर्व समाज दुसऱ्या बाजूला अशी स्थिति भारतांत असती तर फारसें बिघडलें नसतें. पण तसें येथे नव्हते. येथे सर्व वर्ण, सर्व जाति, सर्व पोटजाति इतर जातींना हीन ठरविण्यांत धन्यता मानीत असत. त्यांतच त्यांना भूषण वाटत असे. कारण त्यामुळे त्या श्रेष्ठ ठरत असत !
 हें श्रेष्ठत्व व तें हीनत्व हें कर्तृत्वावर, पराक्रमावर, गुणांवर अवलंबून होतें असें नव्हे. तें जन्मावर होतें, जातीवर होतें आणि त्याच्या मागे रूढि व धर्मशास्त्र सतत उभें होतें. जाणूनबुजून अशी विषमता पोसणाऱ्या असल्या धर्मशास्त्राच्या फासांतून समाज मुक्त झाल्यावांचून येथे राष्ट्र संघटना अशक्यच होती.
 राष्ट्र हा संघटित समाज होय आणि समाज संघटित होणें व त्याची संघटना कायम टिकून राहणें यासाठी सर्व समाजाला सतत कांही तरी सामुदायिक, सामूहिक, सर्वसंग्राहक ध्येय असणें अवश्य असतें, पण तमोयुगांतील धर्मशास्त्राने सर्व समाजाला