पान:इहवादी शासन.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १६१
 

राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी माझ्या शिरावर आहे, असें मानणाऱ्या व्यक्तींचा समाज म्हणजेच राष्ट्र. जेथे ही भावना नाही तेथले लोक म्हणजे राजाची प्रजा असते. ते नागरिक नसतात, व्यक्ति नसतात. भारतांत पूर्वी सर्व प्रदेशांत अशी प्रजा होती. परकीय आक्रमण कसें निवारावें, युद्धतंत्रांत कोणता फेरबदल करावा, शिक्षणाची पुनर्घटना कशी करावी, कोणत्या विषयाचे अध्ययन व्हावें, शेतीचा विकास कसा होईल, औद्योगिक उत्पादन कसे वाढेल या व असल्या राष्ट्रीय समस्यांचा विचार त्यांच्या मनाला शिवतहि नसें; कारण या विचारांचा व्याप पेलण्यास मनुष्याचें मन प्रगल्भ, समर्थ व मुक्त असणें अवश्य असतें. तसे येथे मुळीच नव्हतें.
 येथल्या अस्पृश्यांची व शूद्रांची काय कहाणी होती ? त्यांच्या जीवनाला कसली प्रतिष्ठा होती ? महार, मांग, धेड हे रस्त्याने गेले तरी रस्ते विटाळत असत. त्यांची सावली सुद्धा अपवित्र होती. शूद्रांची स्थिति तितकी नाही, तरी तत्समच होती. परीट, न्हावी, कुंभार, धनगर यांची नांवेंहि उच्चारू नयेत असा वरिष्ठ वर्णाच्या घरीं दंडक होता. त्यांच्या स्पर्शाचें अन्नपाणी यांना वर्ज्य होतें. ज्यांचें सर्व जीवनच अशा रीतीने तुच्छ व अशुभ मानले जात होतें, त्यांना समाजाच्या भवितव्याची चिंता वाहण्याइतकें मानसिक सामर्थ्य लाभणें शक्य आहे काय ? हे लोक राष्ट्र या संघटनेचे घटक होऊच शकणार नाहीत. त्या घटकांकडून अगदी किमान ज्या अपेक्षा आहेत त्याच सफल होणें त्या काळांत शक्य नव्हते; आणि हेच लोक केव्हाहि बहुसंख्य असतात. असे लोक राष्ट्र घडवू शकत नाहीत.
 गीतेमध्ये "माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य व शूद्र आणि अंत्यजादि ज्या पापयोनि आहेत त्यांनाहि परम गति लाभेल" असा भक्तीचा महिमा सांगितला आहे. या गीता-वचनाचा अर्थ लावतांना पापयोनि हा शब्द स्वतंत्र न घेतां, स्त्रिया, वैश्य व शूद्र यांनाच तो लावून पूर्वीच्या टीकाकारांनी त्या सर्वांनाच पापयोनि ठरविलें होतें. लो. टिळकांना हा अर्थ मान्य नाही. पण मागल्या काळी असा अर्थ भाष्यकारांनी लावला होता, हें ध्यानांत घेतलें पाहिजे.
 याचा अर्थ असा की, अंत्यज व शूद्र यांच्याबरोबरच स्त्रिया व वैश्य यांच्याहि जीवनाची प्रतिष्ठा पूर्वीच्या धर्मशास्त्रज्ञांनी नष्ट केली होती. युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माने व्याजबट्टा व व्यापार करणाऱ्या वैश्यवर्गाला हीन लेखिलें होतें. त्यामुळे त्या वर्गाची अस्मिता नष्ट होऊन त्याचें कर्तृत्व लोपलें होतें. प्रोटेस्टंट पंथाने त्यांच्यावरचा हीनतेचा शिक्का काढून टाकला, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली तेव्हाच युरोपांत औद्योगिक क्रांति होऊ शकली, हें मागील लेखमालिकेत सांगितलेंच आहे. भारतांत सर्वच समाजाच्या बाबतींत मध्ययुगीन धर्मशास्त्राने विपरीत धोरण अंगीकारलें होतें. स्त्रिया व वैश्य हे पापयोनि आहेत, असें ठरविल्यानंतर कलियुगांत क्षत्रियांना अस्तित्वच नाही, असा येथल्या धर्मशास्त्रज्ञांना शोध लागला. म्हणजे
 इ, शा. ११