पान:इहवादी शासन.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६० । इहवादी शासन
 


धर्मपरिवर्तनाची पूर्तता

 ब्राह्मण हा जातिमात्रोपजीवी असला तरी, केवळ ब्राह्मणब्रुव असला तरी तो चालेल, पण राजाचा धर्मप्रवक्ता शूद्र कधीहि असता कामा नये, असा मनूचा दंडक होता. श्रुतिस्मृति शूद्राने नुसत्या ऐकल्या तरी त्याच्या कानांत शिशाचा रस ओतावा, असें धर्मशास्त्र होते. पण स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेने अस्पृश्य गणलेल्या जातींत जन्मलेले डॉ. भीमराव आंबेडकर यांनाच मनूच्या सिंहासनावर बसवून त्यांना भारताचें धर्मशास्त्र रचण्याची विनंती केली. धर्मपरिवर्तन येथे पूर्ण झालें.
 आणि हे सर्व बुद्धिपुरस्सर झालें. न्या. मू. रानडे यांनी म्हटलें आहे की, "बुद्धिपुरस्सर सुधारणा करणें हेंच मी श्रेष्ठ कार्य मानतों. कारण बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्यावांचून स्वोन्नति होत नाही." सुधारणेचे तत्त्वज्ञान धर्मक्रांतीच्या अभ्यासाने, अवलोकनाने मांडलेले सिद्धान्त यांचे महत्त्व गेल्या लेखांत सांगितलें, त्याचा हाच अर्थ आहे.


 पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे गेल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतांत बुद्धिप्रामाण्य आलें, ऐहिक उत्कर्षाच्या आकांक्षा येथे निर्माण झाल्या, धर्मपरिवर्तनाला लोक सिद्ध झाले, विवेकनिष्ठेची महती त्यांस समजूं लागली आणि या सर्व कारणांनी आमचें मनुष्यत्व मुक्त झाल्यामुळेच हिदुस्थानांत राष्ट्रनिर्मिती शक्य झाली. इहवादाचें हेंच फल आहे. त्याने मनुष्यत्व मुक्त होतें.
 न्या. रानडे यांनी याच फलाची अपेक्षा व्यक्त केली होती. "आमचें मनुष्यत्व मुक्त झालें पाहिजे, आमच्या आशा उसळू लागल्या पाहिजेत, सर्वांशी समबुद्धीने व्यवहार करणारी न्यायबुद्धि प्रज्वलित झाली पाहिजे. बुद्धीवर आलेले सर्व अभ्र वितळून गेलें पाहिजे आणि सर्व तटबंदीचें उल्लंघन करून आमच्या प्रेमाची गंगानदी वाहूं लागली पाहिजे; म्हणजेच हिंदुस्थानाला नवजीवन प्राप्त होईल व हा देश आपल्या परिस्थितीवर व भवितव्यावर प्रभुत्व गाजवू लागेल." गेल्या दोन लेखांत आमचें मनुष्यत्व कसें मुक्त झाले तेंच स्पष्ट करून सांगितलें आहे. मनुष्य मुक्त झाला तरच तो समाज मुक्त करूं शकतो. तोच अंध बंधनांनी बद्ध असेल, अर्थशून्य रूढींचा दास असेल, तर तो स्वदेशाला मुक्त करूं शकणार नाही. त्याच्या मानवत्वालाच प्रतिष्ठा नसेल, तर तो राष्ट्राची प्रतिष्ठा कशी सांभाळणार ?
प्रतिष्ठेचा अभाव

 ब्रिटिश येण्यापूर्वी दुर्दैवाने भारतांत हजार-दीड हजार वर्षे येथल्या मानवाला प्रतिष्ठाच नव्हती. राष्ट्र या संघटनतत्त्वाचें स्पष्टीकरण मागे अनेक वेळा केलें आहे.