पान:इहवादी शासन.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १५९
 

 हें धर्मपरिवर्तन त्यांनी कसें व कोणत्या बाबतीत घडविलें याचें तपशिलाने वर्णन देण्याचें कारण नाही. आज तें प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर आंधळ्यालाहि दिसावें इतक्या स्पष्टपणें उभे आहे. जातिभेद, अस्पृश्यता, समुद्रबंदी, सोवळें-ओवळें, जातिविशिष्ट व्यवसाय व आचार आदि ज्या बंधनांचा उल्लेख वर केला आहे त्यांतील प्रत्येक बंधन कायद्याने आता नष्ट केलेलें आहे.
 रूढींचाहि प्रभाव आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. जाति-बहिष्कार हा तर ब्रिटिश अमलांतच कायद्याने दंडार्ह ठरविलेला होता. तेव्हा अंध धर्माची सत्ता आता पुष्कळच ढिली झाली आहे, असें म्हणावयास हरकत नाही. म्हणून सामाजिक परिवर्तनाचा तपशील न देतां पूर्वीचें चित्र कसें पालटलें आहे तेवढे दाखविण्या पुरत्या कांही महत्त्वाच्या घटनांचा निदश करतों.

बदलेले चित्र

 राजा राममोहन राय यांनी सोळाव्या वर्षी मूर्तिपूजेचा निषेध केला व त्या पायी घर सोडलें. पुढे इंग्रज सरकारला विनंती करून सतीची चाल त्यांनी बंद करविली आणि १८३० साली समुद्रगमन करून ते परदेशाला गेले. बाळशास्त्री जांभेकर यांनी श्रीपाद शेषाद्री यास शुद्ध करून स्वधर्मात परत घेतलें. दादोबा पांडुरंग यांनी 'परमहंस मंडळी' स्थापून भिन्न जातीयांचें एकत्र खानपान सुरू केलें. ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली, स्वतःच्या घरांतला हौद अस्पृश्यांना खुला करून दिला व मुलींची शाळा स्थापिली. केशवचंद्र सेन यांनी मिश्रविवाह घडवून आणण्यास प्रारंभ केला. याच वेळीं ब्राह्म समाजांतील अनेक ब्राह्मणांनी जानव्याचा त्याग केला. प्रार्थना समाजाच्या नेत्यांनी विधवाविवाह घडवून आणले व पंढरपुरास अनाथाश्रम स्थापून अनौरस संततीच्या संरक्षणाची व्यवस्था केली.
 धोंडोपंत कर्वे यांनी स्वतः विधवाविवाह केला व अनाथ बालिकाश्रम स्थापून तें कार्य हातीं घेतलें. शशिपाद बंदोपाध्याय, महर्षि वि. रा. शिंदे, राजर्षि शाहू- महाराज, श्रीमंत सयाजीराव महाराज यांनी अस्पृश्यांसाठी वसतिगृहें, शाळा व स्वतंत्र संस्था स्थापून स्पृश्यास्पृश्य पंक्तिभोजन व क्वचित् विवाह घडविले. सेवासदन संस्थेने स्त्रियांना परिचारिकांचें शिक्षण देऊन अखिल भारतांत स्त्रीला एक व्यवसाय मोकळा करून दिला. सौ. आनंदीबाई जोशी ही स्त्री एकटी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली व डॉक्टर होऊन परत आली. केरळांत एळुवा या अस्पृश्य जातीचे एक गृहस्थ नारायण गुरु यांनी संस्कृत विद्या हस्तगत करून वेद- वेदान्ताचा व योगशास्त्राचा अभ्यास केला आणि मग समाजसुधारणेच्या कार्याला प्रारंभ केला. अस्पृश्यांसाठी त्यांनी एक शिवमंदिर बांधलें. अस्पृश्य माणसाने उभारलेलें हें भारतांतलें पहिलेंच देऊळ होय. जातिहीन व वर्गहीन समाज निर्माण करण्याच्या कार्यातच त्यांनी आपले आयुष्य वेचलें. धर्मपरिवर्तनाची परिसीमा झाली डॉ. आंबेडकर घटनाकार झाले तेव्हा !