पान:इहवादी शासन.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८ । इहवादी शासन
 

स्मृति रचल्या जात होत्या, हें दिसून येऊन मनु-याज्ञवल्क्यांची त्रिकालज्ञता नाहीशी होईल, निदान शंकास्पद तरी ठरेल आणि असें झाल्यावर त्या स्मृतींवर भाष्य टीका लिहिणाऱ्या निबंधकारांनाहि जें प्रामाण्य आलेलें असतें तें टिकून राहणें कठीण होईल.
 मूळ ग्रंथांबरोबर त्यांवरील टीकाहि प्रमाण मानल्या पाहिजेत या आग्रहामुळे जगांत फारच अनर्थ झालेले आहेत. बायबलचा स्वतंत्र अर्थ लावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हें पोपला कधीच मान्य नव्हतें. मुस्लिमांची अनेक शतकें हीच धारणा होती. मार्क्स, एंगल्स यांचा स्टॅलिनला जो अर्थ समजला तोच इतरांना समजला पाहिजे, असा सोव्हिएट रशियांत दंडक होता. आता स्टॅलिनच्या जागी कोसिजिन आला आहे, इतकेंच. इतिहासाच्या प्रकाशामुळे अंधश्रद्धेची काजळी गेली की, मूळ स्पष्ट दिसूं लागून मनुष्याची प्रज्ञा स्वतंत्र चिंतन करूं लागते आणि मूळ धर्मग्रंथांचा नुसता अर्थ लावण्याचा अधिकार जरी तिला मिळाला तरी शब्दप्रामाण्याचें, घातकत्व कांहीसें कमी होते आणि मग कालांतराने पूर्ण बुद्धिप्रामाण्य मनुष्याच्या मनाला लाभतें.
 बुद्धिप्रामाण्यामुळे धर्मपरिवर्तन हें ओघानेच येतें. किंबहुना तें आलें तरच बुद्धिप्रामाण्याचा खरा उपयोग. देश-काल-परिस्थिति बदलत असते व त्याप्रमाणे धर्मशास्त्र बदलणें अवश्य असतें. पण धर्म-ग्रंथ परमेश्वरप्रणीत आहेत, त्यांचे कर्ते ऋषिमुनि हे त्रिकालज्ञ होते, त्यांनी भूत- भविष्य- वर्तमान काळासाठी तें शास्त्र सांगितलेलें आहे, त्यांत रेखामात्र सुद्धा बदल करणें हें पाप होय, अशी विचारसरणी शब्दप्रामाण्यामुळे समाजांत रूढ झालेली असते आणि त्या अंधश्रद्धेमुळेच धर्माची ऐहिक जीवनावर सर्वंकष सत्ता प्रस्थापित होते.

अधःपाताचें कारण

 जातिभेद, चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता, बालविवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, स्त्रीची प्रतिष्ठा, कर्मकांडांतील व्रतवैकल्यें, यमनियम, गंधयज्ञोपवितादि आचार, भक्ष्याभक्ष्य, सोवळें-ओवळें, शुद्धि, वेदबंदी, व्यवसायबंदी, समुद्र बंदी इत्यादि बंधनें यासंबंधीचें जें शास्त्र त्याची हिंदूंच्या जीवनावर ब्रिटिशांच्या आधी सात-आठ शतकें अशीच अंध अविवेकी सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे या समाजाचा पूर्ण अधःपात झाला होता. कोणत्याहि प्रकारचें कर्तृत्व असें त्याच्या ठायीं राहिलें नव्हतें आणि तरीहि या अंध धर्मशास्त्रामुळे आपला अधःपात होत आहे, असा विचार तत्कालीन मूढ धर्माचार्यांच्या चुकून सुद्धा मनांत येत नव्हता. पाश्चात्त्य विद्येच्या अध्ययनामुळे आपला रूढ, अंध, जड धर्म आपल्या नाशास कारण झालेला आहे, हें नवविद्यासंपन्नांच्या प्रथम ध्यानांत आलें व बुद्धीला स्वतंत्र विचार करण्याची शक्ति प्राप्त झाल्यामुळे त्या हीन धर्माचा उच्छेद करून. धर्मपरिवर्तनाच्या कार्याला त्यांनी निर्भयपणें प्रारंभ केला.