पान:इहवादी शासन.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १५७
 

याच्या जोडीला वेदांतील अनेक सूक्तें स्त्रियांनी व इतर अनेक नाग, सर्प या आज शद्र गणल्या गेलेल्या जमातींच्या ऋषींनी रचली आहेत, हें समजल्यावर तर स्त्री- शूद्रादिकांना वेदाधिकार नाही इत्यादि कल्पना निरस्त होऊन भ्रांतीचीं पटलें साफ नाहीशी होतात.
 कालनिर्णयाच्या प्रयत्नांतून, जुन्या अनेक धर्मग्रंथांत, उत्तरकाळच्या पंडितांनी वाटेल तशी भर टाकली आहे हें ध्यानांत येते आणि मंग त्या ग्रंथांच्या प्रामाण्याचा पाया ढासळू लागतो. महाभारत हा ग्रंथ व्यास, वैशंपायन व सौती या तिघांनी मिळून रचला आहे व त्यांतील पहिल्या व तिसऱ्या ग्रंथकारांत दीडदोन हजार वर्षांचें अंतर होतें, हें सत्य पुढे येतांच त्या ग्रंथामागची भ्रांत पुण्याई नष्ट होऊन प्राचीन काळच्या पंडितांचें विचारधन, त्या काळचा ज्ञानकोश हें त्याचें यथार्थ स्वरूप तेवढें शिल्लक राहतें. मनु असा कोणी ऐतिहासिक पुरुष नव्हता. असला तरी त्याने सध्याची मनुस्मृति रचलेली नाही, ती भृगु नांवाच्या दुसऱ्या कोण्या ऋषीने रचलेली आहे व तींतहि मागून कोणी तरी संगति विसंगति यांचा कसलाहि विचार न करतां मन मानेल तशी भर घातलेली आहे, हा विचार त्यां स्मृतीच्या प्रामाण्याला जबरदस्त धक्का देईल यांत शंका नाही. या इतिहास दृष्टीमुळे पुराणांची तर अगदी चिरफाड होते व त्याबद्दलचा आदर लोपतो. एवढेच नव्हे, तर त्यांच्या विषयी कमालीचा अनादर निर्माण होतो.
 वेद, महाभारत, पुराणें यांतील देवदेवतांवर इतिहासाचीं क्ष-किरणें पडली, तर त्यांच्या भोवतालचें तेजोवलय वितळून जातें व केव्हा केव्हा या मूळ रूपाच्या दर्शनाने मनांत घृणा निर्माण होते. हर्बट स्पेन्सरच्या सिद्धान्तांच्या आधारें, 'महादेव' या देवतेची कल्पना पिशाच्च कल्पनेतून परिणत झाली आहे असा विचार आगरकरांनी मांडला आहे. इतरांनी पिशाच्च ही प्राचीन काळीं एक जमात असून, तिचा महादेव हा पुढारी होता असें म्हटलें आहे. श्रीकृष्णाविषयी असेच श्रद्धाभंग करणारे विचार इतिहास सांगतो. गीताकार श्रीकृष्ण व गोकुळांतला श्रीकृष्ण हे एक नव्हेत, येथपासून संपूर्ण गीता श्रीकृष्णाची नाही येथपर्यंत इतिहास जातो. इंद्र, वरुण यांना वेदांतच असुर म्हटलें आहे. सध्या असुर शब्दाचा जो रूढ अर्थ आहे त्याशी हें अत्यंत विसंगत आहे.

भ्रान्तिष्ट कल्पना

 मनु, याज्ञवल्क्य, नारद, पराशर, देवल आदि स्मृतिकारांचे काळ समजले आणि त्यांच्या स्मृतींवर भाष्ये लिहिणारांचे काळ समजले म्हणजे सर्व स्मृति एकाच काळी झाल्या व बाह्यतः त्यांतील वचनें परस्परविरुद्ध दिसत असली, तरी त्यांचा अर्थ एकच आहे ही कल्पना किती भ्रांतिष्ट आहे हें ध्यानांत येण्यास वेळ लागणार नाही. देश-काल-परिस्थिति पाहूनच मागे नव्या नव्या