पान:इहवादी शासन.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४ । इहवादी शासन
 

शिक्षण, विवाह, कुटुंबसंस्था, अनेक धर्माचार या जीवनांतल्या प्रत्येक बाबींत सोव्हिएट शासनाची निरंकुश सत्ता चालते आणि तशी ती चालवून तें शासन सारखें हस्तक्षेप करीत असतें. धर्माची सत्ता पूर्वी या प्रत्येक बाबतींत चालत असल्यामुळे धर्माचा ज्यांना समूळ नायनाट करावयाचा आहे त्यांना असा हस्तक्षेप अनिवार्यच आहे. धर्म ही खाजगी बाब आहे, याचाहि अर्थ असाच समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरांत आपल्या मनाप्रमाणे, मताप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे धर्मसाधन करावें, त्याला संपूर्ण मुभा आहे, असा याचा अर्थ होतो. पण प्रत्येकाला म्हणजे कोणाला ? कम्युनिस्ट संघटनेच्या सभासदांना अशी मुभा नाही. श्रद्धा असलेला धर्मनिष्ठ मनुष्य कम्युनिस्ट संघटनेचा (पार्टीचा) सभासद होऊच शकणार नाही आणि झालेल्या सभासदाविपयी तशी नुसती शंका आली तरी, त्याची हकालपट्टी होईल. विद्यापीठांतील बहुसंख्य विद्यार्थी वसतिगृहांत राहतात. त्यांना तेथे धर्माचाराचें स्वातंत्र्य नाही. क्रॉस गळ्यांत अडकविल्याबद्दल कांही विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतून हाकलून देण्यांत आलें होतें. आता राहिलीं खाजगी घरें. पण तेथेहि धर्मविरोधी प्रचारक येऊन तुमच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न करतातच. त्या परिवर्तनासाठी दबावहि आणतात. आणि तरीहि लोकांनी जुमानले नाही. नास्तिकवाद पत्करला नाही, तर दंडशहांची इतराजी होऊन उत्कर्षाचे अनेक मार्ग बंद होतील, ही भीति असते. तेव्हा ही खाजगी बाब आहे व प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे, या म्हणण्यांत फारसा अर्थ नाही. १९३६ च्या घटनेने तसें स्वातंत्र्य दिलेलें आहे. पण त्या घटनेने व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, हेहि दिलेलें आहे. प्रत्यक्षांत कोणतेंच स्वातंत्र्य रशियन जनतेला उपलब्ध होत नाही !
 येथे एक गोष्ट आपण ध्यानांत ठेवली पाहिजे की, कम्युनिस्ट नेत्यांना धर्म हा कोणत्याहि रूपांत नको आहे. जगांतल्या इतर देशांत गेली दोन-तीन शतकें धर्मसुधारणा चालू आहे. जुना पोथीनिष्ठ, अंधसैद्धांतिक, कर्मकांडात्मक, विषमतावादी, निवृत्तिवादी, धर्म आज कोणालाच नको आहे. पण धर्म मुळांतच नको, अशी भूमिका जगांतला कोणताहि देश घेत नाही. बहुतेक देशांत लोकांनी धर्म हा विज्ञानपूत करून घेतला आहे. जगांतल्या बहुतेक सर्व थोर शास्त्रज्ञांनी धर्माची आवश्यकता सांगितली आहे. पण कम्युनिस्टांना यांतलें कांही मान्य नाही. धर्मसुधारणा ही त्यांच्या मतें जास्तच वाईट फसवणूक आहे. लुडविग् फायरवाक् याला कम्युनिस्ट लोक फार मानतात. पण त्याने जुन्या धर्मावर टीका करून नव-धर्माची - बुद्धिनिष्ठ, विज्ञानपूत धर्माची समाजाला आवश्यकता आहे, असें म्हटल्या बद्दल एंगल्सने त्याच्यावर टीका केली होती व लेनिनने तिचें समर्थन करून फायरवाकला दोष दिला होता. आर्थर ड्र्यूज या जर्मन शास्त्रज्ञावर स्वतः लेनिनने याच कारणासाठी टीका केली आहे. या शास्त्रज्ञाने, ख्राईस्ट कधी झालाच नव्हता, असें मत मांडलें होतें आणि अनेक धार्मिक रूढींवर, दुर्मतांवर व दुराग्रहांवर प्रखर टीका