पान:इहवादी शासन.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६ । इहवादी शासन
 

 व्यक्तिवाद, बुद्धिप्रामाण्य, विवेकस्वातंत्र्य, अनुभवप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा यांचें एक अत्यंत प्रभावी पुरस्कर्ते म्हणजे स्वा. सावरकर हे होत. त्यांचे जात्युच्छेदक निबंध, गाईविषयीचे निबंध, इतिहासविषयक ग्रंथ, त्यांचे वैज्ञानिक निबंध यांवरून त्यांच्या बुद्धिप्रामाण्याचा दर पावलाला प्रत्यय येत असतो. 'दोन शब्दांत दोन संस्कृति' या त्यांच्या निबंधांत त्यांच्या सर्व बुद्धिवादाचा सारार्थ आलेला आहे. प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगनिष्ठ संस्कृतीचा त्यांनी या निबंधांत केलेला पुरस्कार इहवादाच्या अभ्यासाला अतिशय उपकारक होईल. यज्ञ, शंकराचार्य, गोमाता, मनु राजर्षि, या सर्वांविषयीच्या ज्या रूढ भावना त्यांचे त्यांनी आपल्या साहित्यांत अगदी विदारण करून टाकलें आहे. आपल्या समाजाच्या उत्कर्षापकर्षाची चिकित्सा करून त्यांनी जो सप्तशृंखलांचा सिद्धान्त सांगितला आहे त्यांत इहवादी तत्त्वांचा सर्व भावार्थ आलेला आहे. त्यांचें हें सर्व विचारधन पाहतां इहवादाच्या पुरस्कर्त्यांत सावरकरांचे एक अनन्य स्थान आहे असें वाटतें.

इतिहास- चिकित्सेचें महत्त्व

 पाश्चात्त्य विद्येमुळे बुद्धिप्रामाण्यांत आलें आणि त्या विद्येमुळेच भारताच्या प्राचीन इतिहासाची चिकित्सा सुरू झाली. या इतिहासचिकित्सेमुळे रूढ धर्मकल्पनांभोवतीं असलेले पावित्र्याचें गूढ वलय नष्ट होतें. सत्याच्या अग्नीत त्यांच्यांतील हीण जळून जातें आणि जनमनाला वाटत असलेला त्यांचा दरारा नाहीसा होऊन मानवी मन त्यांच्या सत्तेपासून मुक्त होतें. 'इस्लाम इन दि मॉडर्न नॅशनल स्टेट' या ग्रंथाचा कर्ता अर्विन रोझेंथॉल याने आपल्या ग्रंथांत या इतिहास- चिकित्सेचें महत्त्व पुनः पुन्हा गायिलें आहे तें यासाठीच. राष्ट्ररचनेसाठी मानवाच्या मनाची जी पूर्वतयारी अवश्य असते ती प्राचीन काळच्या घटनांची ऐतिहासिक चिकित्सा केल्यावांचून होणे शक्य नाही. म्हणून मुस्लिमांनी या चिकित्सेस सिद्ध व्हावें व तींतून निघणारे निष्कर्ष मान्य करण्याची मनाची तयारी करावी असें त्यांनी आवर्जून सांगितले आहे. गेल्या शतकांतील भारतीय पंडितांनी या ऐतिहासिक दृष्टीचा मोठ्या उत्साहाने अवलंब केला आणि आपल्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाचे निष्कर्ष लोकांच्या पुढे मांडून अंध धर्माची सत्ता ढिलावण्यास पुष्कळच साह्य केलें.
 ऐतिहासिक दृष्टि प्रथम जुन्या धर्मग्रंथांचा काल नर्णय करूं पाहते. त्या कालनिर्णयामुळे रूढ, भ्रांत समजुतींना केवढा धक्का बसतो पाहा. लो. टिळकांनी इ. पू. ४५०० च्या सुमारास वेद- संहिता- रचना पूर्ण झाली असा सिद्धान्त मांडला. हा काल कोणाला मान्य असो अगर नसो, पण वेद हे मानवी दृष्टीच्या टप्प्यांतल्या कोणत्या तरी काळांत रचले गेले, हा विचारच मुळी क्रांतिकारक आहे. वेद अनादिकाला पासून आहेतच, सृष्टिनिर्मितीच्या पूर्वीहि ते होते, हा भ्रम त्यामुळे तत्काळ नष्ट होतो, त्यांचें अपौरुषेयत्व लोपतें आणि अर्थातच त्यामुळे त्यांचे प्रामाण्यहि हादरतें