पान:इहवादी शासन.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १५५
 

धर्म हे त्यांचे उद्गार प्रसिद्धच आहेत. "प्रामाण्यबुद्धिः वेदेषु" अशी त्यांनी हिंदु धर्माची व्याख्या केली असली तरी त्यांच्या धर्माचें उद्दिष्ट समाजाचें ऐहिक सुखसंवर्धन हेंच होतें. शिवाय विचारस्वातंत्र्याचे ते कडवे पुरस्कर्ते होते हें आपण ध्यानांत ठेविलें पाहिजे. "जेथे विचारस्वातंत्र्य नाही तें राष्ट्र मेल्यासारखेंच होय, म्हणून तें स्वातंत्र्य नष्ट करूं पाहणारा मनुष्य राष्ट्राचा शत्रु समजला पाहिजे" हे त्यांचे उद्गार अगदी निःसंदिग्ध आहेत. (केसरी २७-८-१९०७).
 महात्माजींनी बुद्धिस्वातंत्र्याचा असाच निःसंदिग्ध पुरस्कार केलेला आहे. "बुद्धीला अमान्य असलेलें व नीतीच्या विरुद्ध असलेलें कोणतेंहि धर्मतत्त्व मी त्याज्य मानतों" असें त्यांनी म्हटलें आहे. "शास्त्र-ग्रंथ-वचन, हें बुद्धिप्रणीत असतें तेव्हा तें मनुष्याला समर्थ करतें व त्याच्या मनाला उदात्तता आणतें. उलट तेंच शास्त्र जेव्हा बुद्धीला दडपून टाकतें तेव्हा तें मनुष्याच्या अधोगतीला कारण होतें. तेव्हा सत्य व बुद्धि यापलीकडे शास्त्र जाऊंच शकणार नाही. अस्पृश्यता, बालविवाह व इतर अनेक घातक रूढि यांना जें शास्त्र आधार देतें तें शास्त्र मी एका क्षणांत नष्ट करून टाकीन." यांसारखीं त्यांचीं अनेक वचनं यंग इंडियांत पाहवयास सांपडतात.
 महात्माजींची अंतर्वाणीवर (आंतल्या आवाजावर) दृढश्रद्धा होती. त्यामुळे त्यांना बुद्धिप्रामाण्यवादी कसें म्हणतां येईल अशी पुष्कळांना शंका येते. शंका खरी आहे. अंतर्वाणी बुद्धिवादांत कधीहि बसू शकणार नाही. पण महात्माजी अत्यंत कडवे व्यक्तिवादी होते. व्यक्ति हें अंतिम मूल्य असें तें मानीत, हें आपण ध्यानांत ठेवलें पाहिजे. शब्दप्रामाण्यवादी माणूस विरोधी टीका कधीहि सहन करीत नाही. पण अशी टीका सामाजिक जीवनाला अवश्य असते असें ते म्हणत व प्रतिपक्षी आणि सहकारी यांच्या ध्रुव-भिन्न मतांचाहि आपल्या स्वतःच्या मताइतकाच आदर करीत. तेव्हा महात्माजींनी ती अंतर्वाणी स्वतःच फार मर्यादित ठेवली होती, असें दिसतें. त्यामुळे त्यांची ती श्रद्धा भारताला फारशी घातक ठरली नाही. त्या मर्यादा तोडून तिचे निर्णय महात्माजींनी जेव्हा अंतिम मानले व ते समाजावर लादले तेव्हा भारताची अपरिमित हानि झाली हें मात्र मान्य केलें पाहिजे.
 जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याचा त्यांनी केलेला पुरस्कार, मुस्लिमांविषयीचें त्यांचें पक्षपाती धोरण व अहिंसेवरील एकांतिक श्रद्धा ही भारताला अत्यंत घातक ठरली आहे. पण असें जरी असले तरी, प्रत्येक व्यक्तीला आपल्या विवेकाच्या बळावर विश्वातील सर्व प्रकारच्या अधिसत्तांचे निर्णय धिक्कारण्याचा पूर्ण अधिकार आहे व आपल्या विवेकाच्या आदेशाप्रमाणे उच्चार व आचारहि करण्याचें स्वातंत्र्य आहे, हा जो त्यांच्या जीवनाचा मौलिभूत सिद्धान्त तो इहवादाचा आत्माच आहे, हें आपण ध्यानांत घेतलें, तर महात्माजी बुद्धिवादाचे मोठे पुरस्कर्ते होते हें आपल्याला मान्य ओईल असें वाटतें.