पान:इहवादी शासन.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४ । इहवादी शासन
 

सर्व लोकांच्या तुलनेने अत्यंत जहाल असा आहे. मनु- पाराशरादिकांचे प्रामाण्य आम्ही मानीत नाही असें सांगतांना ते म्हणतात, "एखाद्या- दुसऱ्या मनूची आणि पाराशराची कथा काय ? अशा शेकडो मनूंचे किंवा हजारो पाराशरांचे आधार दाखविलेत तरी आमच्या मूर्ख धार्मिक समजुतीस लागलेला वणवा आता विझणार नाही."
 बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा याहून थोडा निराळा असा एक आणखी पक्ष आहे, सर्वत्रच तसा असतो. सर्व समाजाने हजारो वर्षे वंद्य मानलेले ग्रंथ आम्ही मानीत नाही, असें ते म्हणत नाहीत. पण त्या ग्रंथांचा आपल्या बुद्धीप्रमाणे स्वतंत्र अर्थ लावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असें त्यांचें म्हणणें असतें. स्वामी दयानंद, लो. टिळक, स्वामी विवेकानंद हे या पक्षांतले धर्मधुरीण होत. यांची सुधारणाबुद्धि, समाजहितबुद्धि, इतकेंच काय, पण क्रांतिवृत्तीहि वरील लोकांच्या- इतकीच तीव्र जहाल आहे. पण बहुजन समाजाला बरोबर घेऊन जावयाचें, असें त्यांचें धोरण असल्यामुळे जुना धागा एकदम तोडून टाकणें त्यांना सयुक्तिक वाटत नाही.
 युरोपांत वायक्लिफ, जॉन हस, लूथर, कॅल्व्हिन यांसारखे धर्मसुधारक याच धोरणाचा अवलंब करीत हें आपण पाहिलेंच आहे. रोमचें धर्मपीठ व पोप यांचा ते धिक्कार करीत; पण बायबल मात्र वंद्य मानीत. बायबलचा अनादर त्यांनी कधीच केला नाही. त्यांच्या तुलनेने पाहतां दयानंद, विवेकानंद, टिळक, हे अगदी क्रांतिकारकच ठरतील. दयानंद व त्यांचा आर्य समाज हे पूर्णपणे वेदप्रामाण्यवादी होते हे खरें. त्यामुळे प्रार्थना व ब्राह्म या समाजांशी त्यांचें सहकार्य होऊं शकलें नाही हेंहि खरें. पण त्यांनी ज्या धार्मिक व सामाजिक सुधारणा प्रतिपादिल्या व अंमलात आणल्या त्या पाहतां, ते पूर्ण क्रांतिकारक आहेत असेंच दिसेल. जन्मनिष्ठ जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता ते मानीत नाहीत. वैयक्तिक मोक्ष हें व्यक्तीचें अंतिम उद्दिष्ट असूं नये, समाजसेवा, समाजोत्कर्ष (मानवतेचें ऐहिक सुखसंवर्धन) यांतच व्यक्तीचें हित आहे, असें स्वामी सांगत असत. इहवाद यापेक्षा निराळा काय आहे ?
 स्वामी विवेकानंद तर म्हणत की, लोकभ्रम, अंधश्रद्धा, रूढींचें दास्य हे स्वीकारण्यापेक्षा तुम्ही पूर्ण नास्तिक झाला तरी चालेल. नास्तिक माणसांच्या ठायीं एक तेज असतें, रग असते. तशी या अंधप्रामाण्यवादी लोकांच्या अंगीं कधीच असणार नाही. भुकेलेल्यांना निवृत्ति, संन्यास, वैराग्य यांचा उपदेश करणाऱ्या जुन्या संन्यास- मार्गीयांवर कडक टीका करून ते म्हणतात की, "अन्नान्न करून प्राण सोडणाऱ्या कोट्यवधि लोकांच्या मुखीं अन्नाचा घास घालणे हाच खरा धर्म होय."
 टिळकांनी आपल्या धर्माचें स्वरूप असेंच स्पष्ट केलें आहे. "हिंदुस्थान ही आमची मातृभूमि आणि देवता, हिंदुस्थानवासी हेंच आमचें बंधुत्वाचें नातें व त्यांची राजकीय व सामाजिक स्थिति सुधारण्याचा एकनिष्ठ प्रयत्न करणें हाच आमचा