पान:इहवादी शासन.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १५३
 



 इहवादाचें पहिलें तत्त्व म्हणजे बुद्धिप्रामाण्य, अनुभवप्रामाण्य, विवेकप्रामाण्य हे होय, हे मागे अनेक वेळा सांगितलेंच आहे. त्याच्याविरुद्ध तत्त्व म्हणजे शब्दप्रामाण्य किंवा ग्रंथप्रामाण्य किंवा वेदप्रामाण्य हे होय. या शब्दप्रामाण्याने मुस्लिम देश व पाश्चात्य देश यांचा घात कसा झाला हे आपण मागे पाहिलेंच आहे. भारतांत तमोयुगामध्ये हेंच झालें किंवा या शब्दप्रामाण्यामुळेच तमोयुग आलें असें म्हणणें जास्त सयुक्तिक होईल.
 एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून या घातक तत्त्वाचा उच्छेद करून बुद्धिप्रामाण्याचा अवलंब करावयाचा असा भारतीय नेत्यांनी निश्चय केलेला आपल्याला दिसतो. राजा राममोहन राय हे इतर सर्व क्षेत्रांतल्याप्रमाणे याहि बाबतींत या सर्व नेत्यांत अग्रणी होते. त्यांनी स्थापिलेला ब्राह्म समाज हा कोणत्याहि ग्रंथाला ईश्वरनिर्मित व म्हणूनच प्रमादरहित मानीत नाही. राम मोहन हे प्राचीन संस्कृतीचे अभिमानी होते आणि धर्मसुधारणेसाठी त्यांनी उपनिषदांचाच आधार घेतला होता. हिंदु समाजाचा उद्धार करण्यासाठी उपनिषदांतील वेदान्त ही 'तरफ' आहे असें त्यांना वाटे. पण म्हणून त्यांनी उपनिषदवाक्यांचें प्रामाण्य कधीच मान्य केलें नाही किंवा आद्य श्रीशंकराचार्यांप्रमाणे सर्व उपनिषदांची एकवाक्यता करून दाखविण्याचा अट्टाहास केला नाही. "परमेश्वराला वंदन करण्याचें आमचें साधन म्हणजे भूतदया, परोपकार हे होय. एखाद्या ग्रांथिक सिद्धान्तावर श्रद्धा ठेवणें हें नव्हे", असें ते नेहमी सांगत.
 रानडे, भांडारकर यांचा प्रार्थनासमाजहि बुद्धिप्रामाण्यवादीच होता. भांडारकरांनी म्हटलें आहे की, आर्यसमाज वेद हे ईश्वरप्रणीत मानतो. तसें प्रार्थना अगर ब्राह्म समाज मानीत नाही. एकाच काळी व एकाच व्यक्तीला सर्व धर्म देवाने सांगितला असें होणें नाही. कारण धर्म हा नेहमी विकास पावत आहे." लोकहितवादींनी अत्यंत कडक व तीव्र शब्दांत शास्त्रप्रामाण्याचा निषेध करून बुद्धिवादाचा पुरस्कार केला आहे. ते म्हणतात, "मनूचें वचन असो, याज्ञवल्क्याचें असो, ब्रह्मदेवाचें का असेना, 'बुद्धिरेव बलीयसी' असें आहे." "शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरिता रीति घातली आहे, त्यांतून जर विपरीत कांही असेल तर एकीकडे ठेविल्यास चिंता काय आहे ?"

आगरकरांचा बुद्धिवाद

 लोकांना सुख व्हावें असा शब्दप्रामाण्यवादी लोकांचाहि हेतु असतो. पण त्यांना परलोकांतील सुख अभिप्रेत असतें. तो फरक स्पष्ट व्हावा म्हणून "मानवतेचें ऐहिक सुखसंवर्धन हा खरा धर्म", असें आगरकरांनी सांगितलें. आगरकरांचा बुद्धिवाद या