पान:इहवादी शासन.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १५१
 


नाटकांतील आविष्कार

 काव्य- कादंबरीपेक्षाहि नाटकांतला आविष्कार जास्त ठळक, स्पष्ट आणि प्रभावी असतो. भारतीयांच्या अंतरांत नव्या प्रेरणा उसळू लागल्यामुळे अखिल भारतांत सर्व प्रदेशांत नवी रंगभूमि निर्माण झाली. महाराष्ट्रांत किर्लोस्कर, देवल, खाडिलकर यांनी या नव्या प्रेरणांना मूर्त रूप दिलें. हेंच कार्य नर्मदाशंकरांनी गुजरातमध्ये, गुरजाड अप्पाराव यांनी आंध्रमध्ये व सुंदरम् पिले, संबंध मुदलियार यांनी तामीळनाडूमध्ये केलें.
 इतिहास हा तर पूर्णपणें ऐहिक विषय. अर्थातच तो संत, आचार्य, शास्त्री व पंडित यांना अगदी वर्ज्य. विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे की, "आपल्या लोकांच्या मनाचा कल निवृत्तिमार्गाकडे जेवढा दृष्टीस पडतो तेवढा प्रवृत्तिमार्गाकडं नाही. जग सर्व मिथ्या आहे, 'दिसे क्षणिक सर्व हें, भरंवसा घडीचा नसे,' असे विचार ज्यांच्या मनांत घोळावयाचे, अशा लोकांस राज्यांच्या घडामोडी वगैरे गोष्टींचीं वर्णने करून नर-स्तुति गात बसण्याचा कंटाळा असल्यास काय नवल?" पण आता त्या 'नरा'कडंच भारतीयांचें लक्ष वेधल्यामुळे राम, कृष्ण या परमेश्वरी अवतारांनाहि ते 'नर' मानू लागले व त्यांचा इतिहास धुंडाळू लागले आणि त्यांनी, मानवी शक्तीने सर्व पराक्रम केले, हें सांगण्यांत त्यांना अभिमान वाटू लागला.
 न्या. मू. तेलंग, न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर, राजवाडे, लो. टिळक, कन्हय्यालाल मुन्शी, चिंतामणराव वैद्य, मुकर्जी, मुजुमदार यांसारखे थोर पुरुष आता या कार्यात मग्न झाले, हे घडीचा भरंवसा ज्याचा नाही त्या जीवनांतच आता भारताला गोडी वाटू लागली, याचेंच लक्षण आहे. इतिहासाप्रमाणेच गणित, रसायन, पदार्थ- विज्ञान, भाषाशास्त्र आदि विद्यांची आता भारतीय पंडित प्राचीन ऋषींप्रमाणेच उपासना करूं लागले हें त्यांच्याप्रमाणेच यांनाहि ऐहिक काम असल्याचें द्योतक होय.

'अर्थ- कामा'चा महिमा

 तेव्हा भारताची गेल्या शतकांतील प्रगति हा सर्व 'अर्थ- कामा'चा महिमा आहे. हाच प्रवृत्तिधर्म होय. शास्त्रीबुवांनी म्हटल्याप्रमाणे हा धर्म पूर्वी तमोयुगांत येथे नव्हता. "या इहलोकांत जन्माला आल्याचीच मनुष्याला लाज वाटली पाहिजे" अशी शिकवण त्या युगांत त्याला दिली जात होती आणि जन्माला दुर्दैवाने आलोंच तरी स्त्रीपुत्र-आप्तेष्ट यांचा लोभ धरूं नये, असा उपदेश येथे केला जात असे. कारण काय, तर अंतकाळीं ते कोणी कामी येणार नाहीत ! म्हणजे सर्व चिंता अंतकाळची, परलोकाची. इहलोकीचा विचारच नाही. असा हा समाज इहवादी होणें तेव्हा शक्यच नव्हतें. पण आता त्याला येथे जन्मल्याची लाज वाटेनाशी झाली. स्त्री-पुत्रांबद्दल प्रेम असण्यांत त्याला अभिमान वाटू लागला. षड्रिपु हे रिपु नसून, जगाचे हितकर्ते मित्र आहेत, असें तो निःसंकोच सांगू लागला.