पान:इहवादी शासन.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५० । इहवादी शासन
 

ठायीं निर्माण होत होती. मेलेलें मन आत्माविष्कार करूं शकत नाही आणि त्याने केलाच तर तो ठराविक चाकोरीतून तें करतें. नव्या क्षेत्रांत नवे हुंकार द्यावे हें सामर्थ्य त्याच्या ठायीं असूच शकत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तें सामर्थ्य त्याला आलें व सर्व रूढिबंधने तटातट तोडून तें उच्चघोष करूं लागलें.
 पाश्चात्त्य विद्येशीं परिचय होण्याआधीच्या सात-आठशे वर्षांमध्ये भारतीय साहित्य इहवादी आविष्कार जवळ जवळ मुळीच करीत नव्हतें. इ. स. १०००-११०० च्या सुमारास हिंदी, मराठी, कानडी, गुजराती, तेलगू, तामीळ या भाषा परिपक्व दशेला आल्या होत्या, येत होत्या. पण तेथून पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या भाषांचें साहित्य परलोकाकडे, परमार्थाकडेच पाहत राहिलें होतें. धर्म-मोक्ष या पुरुषार्थांकडेच त्याची दृष्टि वळलेली होती. अर्थ- काम याविषयी त्याला कसलीहि स्पृहा नव्हती. त्यामुळे त्या क्षेत्रांतले म्हणजे ऐहिक जीवनाविषयीचे आविष्कार त्यांतून उमटत नव्हते. पण आता ती स्पृहा निर्माण झाली व साहित्यांतून तिचे हुंकार ऐकूं येऊं लागले.
 बंकिमचंद्रांनी आनंदमठ, देवी चौधराणी इत्यादि कादंबऱ्या लिहून राष्ट्रीयत्वाचा संदेश दिला. सुब्रह्मण्यम् भारती हे तामीळ कवि "भारताचा विजय असो, आम्ही सर्व भारतीय एका वंशाचे, एका वर्णाचे आहों, एकरूप आहों" असा उद्घोष आपल्या काव्यांतून करू लागले. गुजरातेंत गोवर्धन त्रिपाठी यांनी 'सरस्वतीचंद्र' ही त्रिखंडात्मक कादंबरी लिहून, देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या नायक- नायिकांचीं चित्रे रेखाटलीं. लोकहितवादींनी लिहिलें आहे की, "युरोपांत स्वदेशसेवा, राष्ट्रसेवा धर्म समजतात. ती वृत्ति आपल्यांत नाही." "देशाभिमान ही वृत्ति एकंदर पौर्वात्य देशांतच नाही," असें विष्णुशास्त्री म्हणाले.
 ही अशी चिकित्सा करण्याचें सामर्थ्यच भारतीय मनाला पूर्वी नव्हतें. इंग्रज हा आपल्याला पराभूत करतो तो त्याच्या तोफखान्यामुळे व कवायतीमुळे, एवढें भारतीयांना समजूं शकलें. तेंहि फार उशिरा. पण निदान समजलें तरी. पण त्या टोपीकराचें खरें सामर्थ्य त्याच्या राष्ट्रनिष्ठेत, समाजसंघटनेंत, व्यक्तिस्वातंत्र्यांत आणि भौतिक विद्येत आहे हें आकळण्याची प्रज्ञाच येथे नव्हती. कलियुगामुळे, दैवी कोपामुळे, पापाचरणामुळे आपला नाश होत आहे, असें येथले मूढ शास्त्री पंडित, आचार्य, स्वामी म्हणत बसले होते. त्यांना मुळांतच बुद्धि नव्हती असें नाही. त्यांच्या इहाकांक्षा मेल्या होत्या. त्यांना 'काम'च नव्हता. म्हणूनच इहलोकीच्या उत्कर्षापकर्षाची चिकित्सा ते करीत नव्हते. आणि भीमाने म्हटल्याप्रमाणे त्यांचे 'अर्थ- काम' तर लोपलेच, पण धर्म-मोक्षहि त्यांना दुरावले. पण आता अंतरांत इहोर्मी हेलावू लागतांच आंध्रमधील वीरेशलिंगम् पंतलू, महाराष्ट्राचे हरिभाऊ, केशवसुत, आसाम- मधील धेकियाल फुकन हे सर्व साहित्यिक त्या ऊर्मि आविष्कृत करूं लागले.