पान:इहवादी शासन.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १४९
 

 दादाभाई नौरोजींचें विविध उद्योग हें या नव्या उन्मेषाचें प्रतीक म्हणून मानावयास हरकत नाही. ते १८५५ साली इंग्लंडला गेले. त्यांना शिक्षणासाठी आधीच जावयाचें होतें. पण पारशी समाजहि हिंदूंप्रमाणे कर्मठ होता. जातां आलें नाही. ते आता गेले. तेथे तीन वर्षे ब्रिटिश राज्यकारभाराचा त्यांनी अभ्यास केला व नंतर १८५९ साली त्यांनी लिव्हरपूलला 'दादाभाई नौरोजी आणि कंपनी' ही व्यापारी कंपनी स्थापन केली. १८७३ साली 'हिंदुस्थानचे दारिद्र्य' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. १८९२ साली पार्लमेंटचे सभासद म्हणून ते निवडून आले. काँग्रसचे ते तीनदा अध्यक्ष झाले व स्वराज्याचा मंत्र त्यांनीच दिला.
 जगन्नाथ शंकरशेट ही दादाभाईंचीच लहान आवृत्ति होती. बाँबे असोसिएशन, बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा या संस्था त्यांनी स्थापिल्या. भारतीयांना कलांचे शिक्षण मिळावें म्हणून पुढाकार घेऊन त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् हें महाविद्यालय उभारलें. व्यापार, कारखानदारी, वाहतूक यांचे महत्त्वहि ते जाणत होते. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचे ते जनक होते. चिंचपोकळीला त्यांच्याच प्रयत्नाने गॅस कंपनी सुरू झाली. मुंबई-ठाणें रेल्वेचे तेच पुरस्कर्ते होते. मुंबई महापालिकेचा पाया त्यांनीच घातला व तेथलें ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयहि त्यांनीच निर्माण केलें.
 १८६३ साली जपानमधले पांच सामुराई सरदार समुद्रगमनबंदी मोडून युरोपला गेले. त्या वेळीं त्या कृत्याला तेथे देहान्तशासन होते. तरी ते गेले. त्या वेळीं त्यांतील दोघे पुरुष, प्रिन्स इटो व मार्क्विस इनोई, जपानच्या पुनर्रचनेत अग्रणी होते. तमोयुगांत भारतांत हें धाडस कोणीं केलें असतें, तर भारताला पारतंत्र्य आलें नसतें. पण हीं बंधनें तोडावीं एवढा प्रबळ कामच भारतीयांच्या ठायीं त्या काळी नव्हता. आता पाश्चात्त्य विद्येमुळे ती प्रेरणा जागृत होताच लोक तीं बंधनें तोडूं लागलें. राममोहन राय परदेशी गेलेच होते. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनीहि युरोपचा प्रवास केला होता. धर्म, ज्योतिष, इतिहास या शास्त्रांत स्वतंत्र संशोधन व्हावें म्हणून त्यांनी 'तत्त्वबोधिनी' नामक सभा स्थापन केली होती. वेद, उपनिषदें अपौरुषेय आहेत आणि ते प्रमाणग्रंथ मानले पाहिजेत हें त्यांना अमान्य होतें.
 ब्राह्मसमाजाने ही बंधने तोडल्यामुळेच अनेक ब्राह्म निःशंकपणे परदेशी जात. सौरेंद्रमोहन टागोर हे मोठे संगीतशास्त्रज्ञ असून, १८७५ मध्येच त्यांनी फिलाडेल्फिया विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ म्युझिक' ही पदवी मिळवली होती. टाटा, दादाभाई यांची समुद्रपर्यटनें जन्मभर चालूच होतीं. पाश्चात्त्य विद्येमुळे भारतीय मन इहवादी झालें. या परदेशांतील निवासामुळे तेच संस्कार त्या मनावर होत होते. त्यामुळेच त्याचें सामर्थ्य वाढून तें अधिकाधिक कार्यक्षम होत होतें. आणि त्यामुळेच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आत्माविष्कार करावा ही प्रबल ऊर्मि त्यांच्या