पान:इहवादी शासन.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८ । इहवादी शासन
 

फक्त करीत. ख्रिस्ती धर्माचें समर्थन व हिंदु आणि मुस्लिम धर्माचें खंडन हें त्यांचे उद्दिष्ट होते. हिंदूंना कांहीच उद्दिष्ट नव्हतें. पण एकोणिसाव्या शतकांत त्यांच्या डोळ्यांपुढे अनेक उद्दिष्टें नाचूं लागतांच त्यांनी अर्वाचीन युगांतल्या या महाशक्तीची उपासना सुरू केली. त्यांना या देशांत सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सर्व प्रकारची क्रांति करावयाची होती. भारत हें एक राष्ट्र घडवावयाचें होतें. येथे लोकशाही स्थापावयाची होती. परदेशांशी व्यापार करावयाचा होता. भारतांत कारखाने काढावयाचे होते. या कार्याच्या सिद्धीसाठी छापखाना व वृत्तपत्रे हें अत्यंत प्रभावी साधन आहे, हें त्यांच्या ध्यानीं येतांच त्यांनी त्या उद्योगाला हात घातला व पन्नास- साठ वर्षांच्या आतच बंगाल हेरल्ड, सुविचार दर्पण, प्रभाकर (बंगाल), दर्पण, दिग्दर्शन, धूमकेतू, प्रभाकर, इंदुप्रकाश, केसरी, मराठा (महाराष्ट्र), दिनमणी, स्वदेश- मित्रम्, हिंदु (तामीळनाडू), विवेकवर्धिनी, इंडियन हेरल्ड, रास्तगोफ्तार, रीजनरेटर अशा सहस्रजिव्हांनी ते आपल्या असंतोषाचा उद्घोष करूं लागले.
 जें छापखान्यांचें तेंच ग्रंथालयांचे. पूर्वी येथे ग्रंथालयें होतीं, पण तीं राजेमहाराजे, विद्वान्, ब्राह्मण, यांच्या घरीं आणि तीं न्याय, वेदान्त, मीमांसा, शिवलीलामृत यांनी भरलेलीं ! आता सर्व समाजाचा कायाकल्प व्हावयाचा, तर सर्व समाजाला ग्रंथालयें हवीं होतीं. आणि तीं भौतिक विद्येच्या ग्रंथांची हवीं होतीं. म्हणून ठायीं ठायीं नगर वाचन मंदिरें स्थापन होऊं लागलीं. १८४० साली नाशिकला, १८४४ सालीं पुण्याला व १८५२ साली साताऱ्याला, अशीं वाचन- मदिरें स्थापन झाली. याबरोबरच वरील उद्दिष्टे साधण्यासाठी ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज, बाँबे असोसिएशन, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, मद्रास नेटिव्ह असोसिएशन, मानवधर्मसभा, सत्यशोधक समाज, भार्गवसभा, ज्ञानप्रसारक सभा, स्टुडंटस् लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन, हिंदू युनियन क्लब, राहनुभाई मझदेस्तन अशा अनेक सभा-संस्था त्यांनी स्थापन केल्या. पूर्वी भारतांत ग्रामसंस्था सर्वत्र होत्या. आता अखिल भारत राष्ट्र हें उद्दिष्ट डोळ्यांसमोर आल्यामुळे अखिल भारतीय संस्था येथे निर्माण होऊं लागल्या.

नव्या उन्मेषाचें प्रतीक

 कारखानदारी ही आकांक्षा या भूमीला सर्वस्वी नवी होती. पेशवाईच्या काळांत येथे चाकू-कात्रीपासून बंदुका तोफांपर्यंत यंत्रनिर्मित वस्तु येत होत्या. पण त्या पाहून आपण तशा निर्माण कराव्या ही बुद्धि येथील लोकांना झाली नाही. त्यांची मनें, त्यांची प्रज्ञा, त्यांची बुद्धि सर्व मेलेली होती. आता ती जिवंत होतांच जमशेटजीटाटा (१८३९–१९०४) प्रथम हाँगकाँगला गेले, मग मँचेस्टरहून यंत्रविद्या शिकून आले व १८७७ साली त्यांनी नागपूरला एम्प्रेस मिल उघडली. नंतर त्यांनी पोलादाचे कारखाने काढले व या उद्योगांना अवश्य त्या विज्ञान संशोधनासाठी बंगलोरला 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'ची स्थापना केली.