पान:इहवादी शासन.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १४७
 

दृष्टीने अगदीच पुरुषार्थहीन दिसतो. विद्या हा खरा त्यांचा पुरुषार्थ. पण शब्दप्रामाण्याला व कर्मकांडाला त्याने आपली बुद्धि गहाण टाकली असल्यामुळे इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, अनेक भाषापांडित्य, रसायन, गणित इत्यादि शास्त्रे या विद्येचें प्राथमिक ज्ञानहि त्याने मिळविलें नाही.
 रॉजर बेकन, कोपर्निकस, केपलर, डेकार्ट, न्यूटन यांना सर्व भूगोल- खगोल व्यापावा, त्याचा भेद करावा अशी भव्य आकांक्षा होती. म्हणूनच सर्व जन्मच्या जन्म त्यांनी या विद्येच्या उपासनेंत घालविले. येथल्या ब्राह्मणांना जानवें, गोमूत्र, हजामत व सोवळेंओवळें यांपलीकडे कांही दिसतच नव्हतें. यांपलीकडे ते गेले असते, तर त्यांची जात बाटली असती, मोक्ष दुरावला असता व या क्षणभंगुर मायामय जगांत त्यांना राहवें लागलें असतें !

पाश्चात्त्य विद्येचा परिणाम

 पण ऐहिकाविषयीची पूर्ण लुप्त झालेली ही क्षुधा पाश्चात्त्य विद्येच्या अध्ययनामुळे एकदम खवळली आणि सर्व जगाचा ग्रास घ्यावा अशी वृत्ति येथे निर्माण झाली. येथल्या पाठशाळांतून जुनी संस्कृत विद्याच शिकवावी असा राज्यकर्त्यांचा विचार होता, पण राजा राममोहन राय यांनी बेकन, डेकार्ट यांच्यापासून प्रगत झालेली पाश्चात्त्य विद्या आम्हांला द्या असा आग्रह धरला आणि इंग्रजांनी तो मान्य केला. पण केवळ तेवढयावरच अवलंबून राहवयास आपले पंडित तयार नव्हते. कोलंबस, शिकंदर, वॉशिंग्टन, फ्रँकलिन, नेपोलियन, न्यूटन यांच्या चरित्रांबद्दल येथे पूर्वी कधी जिज्ञासा वाटली नव्हती. आता भारतीय विद्वान् लोकांनी त्यांचीं चरित्रे मातृभाषेत आणण्यास प्रारंभ केला. फ्रेंच राज्यक्रांति, अमेरिकन राज्यक्रांति यांचे इतिहास त्यांनी स्वभाषेत आणले. शास्त्रज्ञ, भूसंशोधक, तत्त्ववेत्ते, सेनापति, मुत्सद्दी यांचीं चरित्रे व त्यांचे ग्रंथ यांचीं भाषांतरें ते करूं लागले.
 समर्थांनी म्हटलें आहे "नाना पिंडांची रचना । नाना भूगोल- रचना । नाना सृष्टीची रचना | कैसी ते ऐकावी ।। चंद्र-सूर्य- तारामंडळें । ग्रहमंडळें मेघमंडळें । येकवीस स्वर्गे सप्त पाताळें । कैसी ते ऐकावी ॥ रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, नानावल्ली, नाना औषधि, धातुरसायनबुद्धि, नाना तत्वविवंचना ऐसें हें अवघेचि ऐकावें ॥ त्या काळी ही श्रवणभक्ति लोकांनी केली असती, तर पारतंत्र्य पुन्हा आलेंच नसतें, पण तसें झालें नाही. परंतु आता ही ज्ञानलालसा भारतांतल्या सर्व प्रदेशांत उद्भूत झाली आणि त्यामुळे या समाजाचा कायांकल्प झाला.
 या कायाकल्पाचीं, त्या क्रांतीचीं लक्षणें आपणांस पुढे पाहवयाचीं आहेतच. येथे प्रथम मागील लेखांत सांगितल्याप्रमाणे भरतभूमींत नव्या उन्मेषाची विरुढी कशी फुटूं लागली तें पाहवयाचें आहे.
 हिंदुस्थानांत १५५० सालींच पोर्तुगीजांनी छापखाना सुरू केला होता. पंण त्याचा उपयोग आर्चबिशप बास्पर डी लिओ, गार्सिया डा ओर्टा, यांसारखे मिशनरीच