पान:इहवादी शासन.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ३
 

 भांडवलदार, जमीनदार, सावकार यांना किसान-कामगारांची पिळवणूक करावयाची असते. त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून, त्यांचा छळ करून, त्यांच्यापासून पैसा उकळावयाचा असतो. ही अनीति, हा अत्याचार उजळ माथ्याने करतां यावा म्हणून ते धर्माचा आश्रय करतात. हे वर्ग परमेश्वरानेच निर्माण केले आहेत, गरीब लोक हे आपल्या कर्मानेच गरीब झालेले असतात, त्यांत धनिकांचा कांही दोष नाही," अशा तऱ्हेचें तत्त्वज्ञान कष्टकरी जनतेला पाजून, तिची क्रांतिवृत्ति बधिर करून टाकणें हें धर्माचें काम आहे," असें कम्युनिस्टांचें मत आहे. "धर्म ही अफू आहे," असें मार्क्स म्हणाला तें याच अर्थाने. आज तें वचन रशियांत लेनिनच्या स्मृतिमंदिरावर त्याचें ध्येयवाक्य म्हणून, कोरून ठेविलेले आहे.

धर्मगुरूंचा छळ

 परमेश्वर, धर्मपीठे, धर्माचार व एकंदर धर्म यांविषयी असें मत असल्यामुळे हाती सत्ता येतांच बोल्शेव्हिकांनी धर्मगुरूंचा भयानक छळ करण्यास प्रारंभ केला. धर्मशिक्षण, धर्मप्रसार याला कायद्याने बंदी घातलेली होती, तरी अनेक धर्मगुरु धर्मप्रवचनें करीत राहिले. अशा हजारो धर्मगुरूंना तुरुंगांत वा सैबेरियांत धाडण्यांत आलें. कांहींना फाशी देण्यांत आलें. चर्च, प्रार्थनामंदिरें यांचें रूपांतर कारखाने, कार्यालयें यांत करण्यांत आलें. क्रांतिपूर्वी मॉस्कोमध्ये ४०० चर्चे होती. आज तेथे फक्त ३० आहेत. हीं चर्चे, हे धर्मगुरु यांच्या मागे असलेली रशियन ऑर्थोडॉक्स चर्च ही संस्था नष्ट करण्यांत आली. जीं चर्चे व इतर धर्ममंदिरें शिल्लक राहिलीं त्यांच्या सर्व मिळकती जप्त करण्यांत आल्या. या वेळीं घरोघर खाजगी रीतीने उपासना- प्रार्थना करण्यास कायद्याने बंदी नव्हती. तरी अशा ठिकाणी जाऊन धर्मगुरु प्रवचनें करूं लागले तेव्हा त्यांचाहि पोलिस छळ करूं लागले. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्त्या व इतर सवलती मना करण्यांत आल्या आणि जुन्या काळीं धर्मभ्रष्ट, पतित, पापी अशा लोकांची जी स्थिति होत असे ती आता धर्मनिष्ठ, भाविक, श्रद्धाळू लोकांची होऊं लागली.
 १९३६ सालीं सोव्हिएट रशियाची घटना तयार झाली. तीअन्वये प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य दिलेलें आहे. धर्मप्रसाराचें स्वातंत्र्य मात्र नाही. पण उलट धर्म विरोधी प्रचाराचें स्वातंत्र्य मात्र प्रत्येकाला दिलेलें आहे. सरकार अशा धर्मविरोधी संस्थांना साह्यहि करतें. १९२५ साली 'मिलिटंट अथेइस्ट असोसिएशन' नांवाची संस्था यारोस्लाव्हास्की याने स्थापन केली होती. धर्माचा उच्छेद करणें, नास्तिक्याचा प्रसार करणें, हेंच तिचें उद्दिष्ट होतें. सरकारचें तिला भरपूर साह्य होतें. घटनेच्या १२४व्या कलमाप्रमाणे धर्मपीठ व शासन यांची फारकत करण्यांत आली. आणि राजकारणांत धर्माला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही व धर्मात शासनाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा त्याचा खुलासा केला गेला; पण त्याला कसलाहि अर्थ नाही.