पान:इहवादी शासन.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६ । इहवादी शासन
 

असंतोष निर्माण झाला, म्हणूनच सर्व अंध बंधने तोडून ते कांही पुरुषार्थ साधूं शकले.
 येथला शेतकरीवर्ग अनेक शतकें अल्पसंतुष्ट असा होता. सुतार, लोहार, तांबट हा येथला कारागीर. याला चाकोरीबाहेर जाऊन कांही नवें साधावें ही ईर्षाच नव्हती. अनेक पिढ्या तोच धंदा केल्यामुळे त्यांतील कौशल्य वाढत जाऊन त्याची प्रगति होते, असें म्हणतात. तसें जगांत कोठेहि घडलेलें नाही. जातींची हीं व्यवसाय-बंधनें तोडल्यावरच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांति झाली व शेतकरी, सुतार, लोहार, विणकर, चांभार हे लोक पूर्वीच्यापेक्षा दसपट सुबक व शतपटींनी विपुल माल पैदा करूं लागले. ही सर्व प्रगति प्रोटेस्टंट पंथामुळे, त्यांनी धर्मसत्तेचा जो उच्छेद केला त्यामुळे झाली हें पूर्वी सांगितलेंच आहे. त्या दृष्टीने व्यापारीवर्गाचें उदाहरण, शेतकरी व कारागीर यांच्यापेक्षा, जास्त निर्णायक आहे.

पुरुषार्थहीन व्यापारीवर्ग

 भारतांतहि त्या तमोयुगांत व्यापारी होते. पण प्रोटेस्टंट पंथाच्या उदयानंतर युरोपांतील व्यापारीवर्ग संघटित व प्रबळ झाला आणि त्याने राजसत्तेवर वर्चस्व स्थापून सर्वं जीवनांतच क्रांति घडविली. हे व्यापारी केवळ व्यापारी नव्हते, ते राजकारणी होते, लढवय्ये होते, साम्राज्यकर्ते होते. त्या तुलनेने पाहतां भारतीय व्यापारी हा पुरुषार्थहीन दिसतो. पाश्चात्त्य व्यापाऱ्यांनी आपल्या व आपल्या देशाच्या संरक्षणाला आवश्यक तें धन निर्माण केलें, शस्त्रास्त्रे उभारली व धनोत्पादनाला अवश्य तें विज्ञान पैदा करण्यासाठी विद्यापीठांना चालना दिली. म्हणजे त्यांनी एक व्यापारी संस्कृतीच निर्माण केली. पाश्चात्त्य व हिंदी व्यापारी यांची तुलना करून आचार्यं जावडेकरांनी पाश्चात्त्य व्यापारीवर्गाची श्रेष्ठता निर्विवाद सिद्ध केली आहे. (आधुनिक भारत, पृष्ठे ५-१०).
 हें विवेचन करतांना व्यापाऱ्यांनी प्रथम धर्माविरुद्ध बंड केलें, मग सरंजामदारांचा पाडाव केला आणि शेवटीं राज्यसूत्रेहि हातांत घेतली, असा क्रम जावडेकरांनी दिला आहे. त्यावरून आणि ही व्यापारी क्रांति प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांत झाली या इतिहासावरूनहि जीर्ण धर्मकल्पनांच्या उच्छेदावांचून ही क्रांति शक्य नव्हती, हें स्पष्ट होतें. भारतांत ब्रिटिश येण्यापूर्वी ही धर्मक्रांति झाली नाही, त्यामुळे येथल्या शेतकऱ्याप्रमाणेच येथला व्यापारीहि अल्पसंतुष्ट राहिला आणि शेवटीं पराभूत झाला.
 येथले क्षत्रिय व येथले ब्राह्मणहि या कामहीनतेमुळेच पराभूत झाले. येथल्या परकी सत्ता बव्हंशीं हिंदु सेनापतींनीच पोसल्या आहेत. ब्रिटिश राज्याचा तर भारतीय सेना हाच सर्वाधार होता. असें असूनहि आपण राजे व्हावें, सार्वभौम सत्ता आपली असावी, ही ईर्षा त्या वर्गाला कधी वाटली नाही. शास्त्री पंडितांचा ब्राह्मणवर्ग तर या