पान:इहवादी शासन.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १४५
 

सर्वांचा एकच अर्थ आहे, असें सांगितलें पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. आणि तमोयुगाच्या प्रारंभीं झालेल्या निबंधकारांनी या समन्वयपद्धतीचा सर्रास अवलंब करण्याचा जो परिपाठ सुरू केला तो पुढे कायमच राहिला.
 त्यामुळे व्यक्तीचें व्यक्तित्व, तिने विचारपूर्वक निश्चित केलेलें मत, तिने चिंतन करून प्रस्थापिलेले सिद्धान्त याला कांही अर्थच राहिला नाही. आद्य श्रीशंकराचार्य व इतर आचार्य यांनी दहा उपनिषदें, गीता व ब्रह्मसूत्रे यांवर भाष्य लिहितांना याच घातक समन्वयपद्धतीचा अवलंब केला आहे. शतका- शतकांच्या अंतराने झालेल्या या बारा ग्रंथांत कानामात्रेपासून पूर्ण एकमत असणें संभवनीय तरी आहे काय ? पण सर्व भाष्यकारांनी त्यांतील सर्व वचनांतून तसें एकमत असल्याचें सिद्ध करून दाखविलें आहे. मात्र प्रत्येक भाष्यकाराने आपलेंच मत त्या सर्व ग्रंथांत असल्याचें सिद्ध केलें आहे !
 हा अगदी अनर्थ आहे. मानवी बुद्धीचा यामुळे अगदी चोळामोळा होतो. तिला धार अशी राहतच नाही. विवेकनिष्ठ सत्याचा दृढ आग्रह यामुळे शिल्लकच राहत नाही. आणि तो न राहिल्यामुळे बुद्धिसिद्ध मताला जें सामर्थ्य यावयाचें तें येत नाही. सत्यासाठी आत्मबलिदान करण्याचें जें धैयं, तें मग कोठून निर्माण होणार ?


 'असंतोषः श्रियो मूलम्' असें वेदव्यासांनी म्हटलें आहे. श्री, समृद्धि, वैभव स्वराज्य, साम्राज्य यांच्या मागे असंतोष ही मूलप्रेरणा असते. हा असंतोष, ही अतृप्ति, ही ऐहिक वैभवाची आकांक्षा जेथे नाही तेथे कोणताच पुरुषार्थ सिद्ध होत नाही. भीमाने या असंतोषालाच 'काम' असें म्हटलेलें आहे. तो नाही तेथे अर्थ तर नाहीच, पण धर्महि साधत नाही. एकंदर सर्व वैभवच त्याच्या अभावी लुप्त होतें, असें तो म्हणतो. 'संतोषो वै श्रियं हन्ति' या वचनाचा हाच अर्थ आहे.
 लोकमान्य टिळकांचा गौरव करतांना, त्यांनी भारतांत असंतोष जागृत केला असें आपण म्हणतों. आपलें स्वराज्य, स्वातंत्र्य गेलें असतांनाहि या भूमींत असंतोष नव्हता असा याचा अर्थ आहे; आणि तें अक्षरशः खरें आहे. भारतांतील सर्व समाज स्वातंत्र्याच्या बाबतींतच नव्हे, तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत कामहीन झाला होता. निवृत्तिवादाने, आचार्य, संत यांनी केलेल्या संसारनिंदेमुळे, मायावाद, कर्मविपाकवाद या सिद्धांतामुळे या भूमीत ऐहिक वैभवाच्या, श्री- समृद्धीच्या सर्व आकांक्षा नष्ट झाल्या होत्या. त्यांतून कोणाच्या चित्तांत तशा आकांक्षा निर्माण झाल्याच तर जातिबंधनें त्याच्या मार्गांत इतके अडथळे आणीत असत की, त्या प्रत्यक्षांत आणणें त्याला शक्यच नव्हतें. त्यामुळे 'ठेविलें अनंते तैसेंचि रहावें,' अशी येथल्या समाजाची वृत्ति झाली होती. पाश्चात्त्य विद्येमुळे भारतीयांचा काम जागृत झाला, त्यांच्या ठायीं
 इ. शा. १०