पान:इहवादी शासन.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४ । इहवादी शासन
 

 गेल्या शतकांत गंगाधर दीक्षित हा गृहस्थ पांच वर्षे मुंबईला राहिला होता. तो युरोपीयनांना मराठी, संस्कृत शिकवीत असे. त्यामुळे म्लेंच्छ लोकांत मिसळून तो बाटला असणारच असें धरून, पुण्याच्या ब्राह्मणांनी त्याला वाळीत टाकले. याप्रमाणे वाळीत पडण्याच्या भीतीमुळे परदेशगमनच नव्हे, तर येथल्याच इतर समाजांत मिसळणें, त्यांचा अभ्यास करणें हें हजार वर्षे भारतांत वर्ज्य झालें होतें. ज्ञानाचें एक द्वार अशा रीतीने आपणच बंद करून टाकलें होतें.
 दुसरें द्वार म्हणजे छापखाना. युरोपांत प्रबोधनयुगाचा छापखाना हा आधार होता, हें मागे आपण पाहिलेंच आहे. १५५० च्या सुमारास पोर्तुगीजांनी गोव्याला छापखाना आणला होता, पण त्याच्या शाईत चरबी असते असा समज होता. कागदाच्या निर्मितींतहि असाच निषिद्ध पदार्थ लागत असे. तेव्हा छापखान्यामुळे जात निश्चितच बाटली असती. गेल्या शतकांत बाळशास्त्री जांभेकरांना 'दिग्दर्शन' हें तुपांतल्या शाईने छापलें जातें, असा खुलासा करावा लागला होता. सोळाव्या शतकांत विद्यापीठांतून बुद्धिवादी, इहप्रवण, वैभवाकांक्षी वर्ग भारतांत निर्माण झाला असता, तर त्याने हे लोकभ्रम नष्ट करून, भारतांत मुद्रणकला आणली असती आणि मग या बुद्धिजीवी वर्गाने लिहिलेले ग्रंथ जनतेपर्यंत गेले असते. आणि अवलोकन, स्वतंत्र अनुभव, प्रयोग, स्वतःचे निर्णय यांचें महत्त्व जनतेला पटून युरोपांतल्याप्रमाणे येथेह शास्त्रज्ञ निर्माण झाले असते.
 भारतीयांना स्वतंत्र प्रयोगाचें महत्त्व प्राचीन काळीं निश्चित आकळलें होतें. तेराव्या शतकापर्यंतहि कोठे कोठे, अपवादात्मक का होईना, तो जिवंतपणा होता. त्या शतकांतला 'रसेंद्रचिंतामणि' या ग्रंथाचा कर्ता रामचंद्र म्हणतो, "पूर्वाचार्यांच्या प्रत्येक सिद्धान्ताचा मी स्वतः प्रयोगाने पडताळा घेतलेला आहे. प्रयोग न करतां एकहि सिद्धान्त मीं दिलेला नाही. जे प्रयोग करीत नाहीत ते रसवेत्ते नसून, नुसते नट होत." विद्यापीठें असती, तर ही प्रयोगशीलता सार्वत्रिक होऊन भारतांत विज्ञानयुग तेव्हाच निर्माण झालें असतें.

समन्वयाचा अतिरेक

 पण तसें झालें नाही व त्यामुळे अंध धर्मसत्तेला आव्हान देणारी जी तिसरी शक्ति तीहि भारतांत निर्माण झाली नाही. आपल्या विवेकाने सत्य सांगितलें त्यासाठी आत्मबलिदान करणारे जे जॉन हस, ब्रूनो, लॅटिमर, क्रॅनमर यांसारखे धीर पुरुष ही तिसरी शक्ति होय. या पुरुषांनी व त्यांच्या हजारो अनुयायांनी सत्याला मुरड घालून असत्याशी तडजोड करण्याचें साफ नाकारलें होतें हें वर सांगितलें आहे. उलट अशी दर पावलाला तडजोड करणें हें भारतांतील तमोयुगांतल्या सर्वच क्षेत्रांतल्या नेत्यांचें लक्षण होतें. मीमांसकांची जी समन्वयपद्धति ती हीच होय. श्रुति, स्मृति, इतर धर्मग्रंथ यांतील वचनांमधून कितीहि परस्परविरोध असो; त्या