पान:इहवादी शासन.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १४३
 

वांचले. पण त्यांनी भौतिक विद्येच्या ग्रंथांच्या अशा प्रती करून ठेविल्या नाहीत. कारण त्यांतून पुण्यप्राप्ति नव्हती म्हणून त्यांचें महत्त्व नव्हते. त्यामुळे तो उद्योग कोणी केला नाही. त्यामुळे ती विद्या लुप्त झाली. आणि ती गेल्यामुळे प्रबोधनयुग नाही त्यामुळे मध्यमवर्ग नाही व म्हणून अर्वाचीन युग नाही. दीर्घकाल तमोयुग !
 युरोपांत रोमपीठाच्या सर्वंकष धार्मिक सत्तेला आव्हान देणारी पहिली शक्ति म्हणजे विद्यापीठे आणि दुसरी शक्ति म्हणजे राष्ट्रभावना. पण ही दुसरी शक्तीहि मध्यमवर्गावांचून निर्माण होत नाही. युरोपांत ती निष्ठा या विद्यासंपन्न मध्यम- वर्गानेच निर्माण केली. अर्वाचीन काळांत सर्व जगांत आता राष्ट्रनिष्ठा प्रभावी झाली आहे; तिच्या मागे प्रेरक शक्ति हीच आहे. लॅटिन अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, चिली, पेरू आदि देश गेल्या शतकाच्या आरंभी स्वतंत्र झाले. पण तेथे राष्ट्रनिष्ठा जोपासली गेली नाही. याचें कारण बुद्धिजीवी मध्यमवर्गाचा अभाव, असेंच लॉर्ड ॲक्टन यांनी दिलें आहे.
 असा हा मध्यमवर्ग विद्यापीठांच्या अभावीं भारतांत निर्माण झाला नाही व त्यामुळे राष्ट्रभावनाहि उदयास आली नाही. तेराव्या-चौदाव्या शतकांत येथे आजच्या तामीळ, तेलगु, मराठी, गुजराती, बंगाली या भाषा चांगल्या प्रौढरूपाला आल्या होत्या. तेव्हा राष्ट्रीय अस्मितेने कारण येथे निर्माण झालें होतें. समर्थ रामदास स्वामींनी 'मराठा तितुका मेळवावा' हा राष्ट्रीय भावनेचा मंत्रहि दिला होता. त्या काळी येथे मध्यमवर्ग असता तर, त्याने ग्रंथ लिहून राष्ट्रीयतेचें तत्त्वज्ञान परिपुष्ट केलें असतें व युरोपांत जसे इंग्लंड, तसें भारतांत महाराष्ट्र राष्ट्रपदवीला पोचलें असतें आणि मग जातिसत्तेचा उच्छेद होण्यास तेव्हाच प्रारंभ झाला असता. किंवा राजवाडे यांनी म्हटल्याप्रमाणे शेकडो रामदास भारतांत निर्माण झाले असते, तर अखिल भारतीय राष्ट्रनिष्ठा येथे उदयास येऊन पोसली गेली असती.

नव्या ज्ञानाकडे पाठ

 ब्रिटिशांच्या राज्यांत पाश्चात्त्य विद्या प्रसृत होऊन विद्यासंपन्न वर्ग येथे निर्माण होतांच ती भारतीय निष्ठा येथे शंभर वर्षांच्या आंतंच, स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्याइतकी प्रबळ झाली. तसेंच सतराव्या-अठराव्या शतकांत घडलें असतें. पण राष्ट्रवाद हा इवादावांचून जन्माला येत नाही आणि इहवाद हा निवृत्तिवादी, परलोकनिष्ठ, मोक्षैकदृष्टीचे लोक, संसाराला माया म्हणणारे लोक जोपासूं शकत नाहीत. चौदाव्या- पंधराव्या शतकांत युरोपीय लोक जगभर भ्रमण करूं लागले होते, तसें भारतीयांनी केलें असतें इंग्रजी, फ्रेंच या भाषांचा अभ्यास त्यांनी केला असता, तर पुढे भारताच्या प्राचीन वैभवाच्या इतिहासाचा युरोपीयांनी केला तसा त्यांनी अभ्यास केला असता; ग्रीक विद्याहि त्यांनी हस्तगत केली असती. पण परदेशगमन करावयाचें नाही, कारण यवन-संसर्ग होऊन जात बाटते!