पान:इहवादी शासन.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२ । इहवादी शासन
 

धर्म-मोक्ष व अर्थ-काम यांतील समतोल बिघडून इतिहास, अर्थशास्त्र, राजनीति, गणित, ज्योतिष या भौतिक विद्यांचें महत्त्व कमी होऊन धर्मशास्त्र, कर्मकांड, तत्त्वज्ञान यांवरच भर दिला जाऊं लागला. यामुळे स्वतंत्र मौलिक संशोधन हळूहळू लुप्त झालें व सृष्टिघटनांविषयीचीं मतें वेदाधारें मांडण्यांत येऊ लागली. आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त या ज्योतिर्विदांना पृथ्वी, चंद्र यांच्या छायेमुळे ग्रहण लागतात, राहू-केतूंमुळे नव्हे हें ज्ञान होते. पण पुराणांनी राहू-केतु उपपत्ति मान्य केली होती. त्यामुळे तिचें खंडन करून लोकांना सत्य सांगण्याचें धैर्य त्यांनी दाखविलें नाही. ब्रह्मगुप्ताने तर लोकाराधनाच्या वृत्तीला बळी पडून छायोपपत्तीच चूक आहे व राहू- केतूपपत्ति वेदांनी सांगितली असल्यामुळे तीच खरी आहे, असें भाष्य करून आर्यभट्टादि पंडितांवर टीका केली आहे. युरोपांत कोपरनिकस, केप्लर, ब्रुनो, गॅलिलिओ यांनी सत्य सांगण्याचें जें नीतिधैर्य दाखविलें तें या पंडितांनी दाखविलें नाही. याचा अर्थ असा की, उत्तरकाळांत अंध धर्माचें वर्चस्व या पंडितांच्या मनावर फार होतें. त्यामुळे शवविच्छेदन, वनस्पति-संशोधन हे सर्वच थांबले आणि भौतिक, ऐहिक विद्या लयाला गेल्या. नवव्या शतकापासून भारतीय विद्यापीठांतील पंडितांची सर्जनशक्ति संपली आणि ते जुन्या ग्रंथांवर टीका, भाष्ये लिहिण्यांतच धन्यता मानं लागले (२४३–२५८).

ऐहिक आकांक्षेचा लोप

 तेव्हा भारतांतील विद्यापीठें तेराव्या शतकांत मुस्लिमांनी नष्ट केलीं हें जरी खरे असले, तरी त्या आधीच त्या विद्यापीठांतील विद्या नष्ट झाली होती व ती साचलेल्या विद्येच्या शुष्क चर्चेचीं पीठें होऊन बसली होती. त्यामुळे भौतिक विद्या, राजकारण, दंडविधान, इतिहास, भूगोल, ज्योतिष, गणित यांच्या अध्ययनामुळे जो एक बुद्धिजीवी वर्ग निर्माण व्हावयाचा तो भारतांत झालाच नाही. भारताच्या प्राचीन काळांत अनेक भौतिक शास्त्रे परिपक्वदशेला आलीं होतीं. जीवनाचीं सर्व अंगें समृद्ध करणें त्यांवाचून अशक्यच होतें. तेव्हा नवीं विद्यापीठें उदयास आली असती किंवा जुनी कार्यक्षम राहिली असती, तर युरोपांत ग्रीक विद्येचें जसें पुनरुज्जीवन झाले तसें भारतीय विद्येचें पुनरुज्जीवन विद्यापीठांत होऊन युरोपप्रमाणेच एक विद्यासंपन्न, बुद्धिजीवी, मध्यम वर्ग येथे उदयास आला असता व त्याने तमोयुग प्रारंभींच नष्ट करून टाकलें असतें किंवा ते निर्माणच होऊं दिलें नसतें. पण त्या सुमारास भारतीय पंडितांची ऐहिक वैभवाची आकांक्षा, त्यांचा कामच नष्ट झाला होता ! असे लोक भौतिक विद्यांची जोपासना कशाला करणार किंवा जुन्या भौतिक विद्यांचें जतन करण्याइतकी तरी रसिकता त्यांना कोठून येणार ?
 हे लोक स्मृति, पुराणे, भाष्यें, निबंध असल्या धर्मग्रंथांच्या अनेक हस्तलिखित प्रती करून ठेवीत, म्हणून दीर्घकालीन मुस्लिम संहारांतूनहि त्यांतले बहुतेक ग्रंथ