पान:इहवादी शासन.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १४१
 

परलोकाची होती. इहलोकीच्या वैभवाची, उत्कर्षाची नव्हती." ती ज्यांना असते त्यांना असलें मूढ, अंध धर्मशास्त्र धिक्कारावेंच लागतें.
 शिवछत्रपतींनी पतितशुद्धि, समुद्रपर्यटन, कलियुगांतील क्षत्रियांचें अस्तित्व, ब्राह्मणांचें जन्मसिद्ध श्रेष्ठत्व यांसंबंधीचें धर्मशास्त्र धिक्कारलें नसतें, तर स्वराज्याची स्थापना झालीच नसती. पेशवे, नाना फडणीस यांनीहि कांही वेळा तें जुनें कर्मकांड त्याज्य ठरवून स्वतंत्रपणे निर्णय दिलेले आढळतात. पण हे सर्व अपवाद होत. जातिभेद, कर्मकांडात्मक धर्म यांसंबंधी भारतांतील संतांनीहि पुरोगामी धोरण अवलंबिलें होतें. पण तें सर्व परमार्थ क्षेत्रांत. ऐहिक व्यवहारांत जातिभेद, चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता यांचें समर्थनच ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांनीहि केलेलें आहे. पण ते राज्यकर्ते व हे संत यांनी केव्हा केव्हा जुन्या धर्मशास्त्रावर टीका केली असली, तरी पश्चिम युरोपांतल्याप्रमाणे येथे इहवादाचें तत्त्वज्ञान कधीहि सिद्ध झालें नाही. म्हणजे नवें धर्मशास्त्र कोणी लिहिलें नाही. मार्सिग्लिओ, पीटर डुबॉइस, इरॅसमस, वायक्लिफ यांच्याप्रमाणे इहवादाचे तत्त्ववेत्ते येथे कोणी झालेच नाहीत. त्यामुळे येथे इहवादाची प्रस्थापना होऊ शकली नाही.

विद्यापीठांचा अभाव

 नवव्या शतकापासून अठराव्या शतकाअखेरपर्यंत जो दुसरा कालखंड त्यांत इहवादी तत्त्ववेत्ते निर्माण झाले नाहीत, याचें कारण असें की, या काळांत भारतामध्ये युरोपसारखी विद्यापीठें कोणी स्थापन केली नाहीत. येथे प्राचीन काळीं तक्षशीला, उज्जैनी, विक्रमशीला, नालंदा अशीं फार मोठीं विद्यापीठें होतीं. त्यांतील बहुतेक प्राचीन काळांतच नाहीशीं झालीं होतीं व राहिलेलीं मुस्लिमांनी धुळीस मिळविलीं. पुढल्या काळांत राजपूत, विजयनगर, मराठे यांनी स्वतंत्र राज्यें स्थापिलीं असलीं, तरी त्यांनी किंवा त्या राज्यांतल्या पंडितांनी भौतिक विद्येच्या अध्ययन- अध्यापनासाठी विद्यापीठें स्थापिली नाहीत.
 खरें म्हणजे भारतांत तेराव्या शतकांत मुस्लिम सत्ता स्थापन होण्याआधीच तीन-चार शतकें भौतिक विद्यांच्या अध्ययनाला शब्दप्रामाण्य व निवृत्ति यांमुळे उतरती कळा लागली होती. डॉ. अ. स. आळतेकर यांनी 'एज्युकेशन इन् एन्शंट इंडिया' या आपल्या ग्रंथांत याचें अतिशय उद्बोधक विवेचन केलें आहे. ते म्हणतात, "इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या सुमारास शब्दप्रामाण्य वाढीस लागलें. शंकराचार्य, रामानुज यांना आपले सिद्धान्त उपनिषद्वाक्यांनी सिद्ध करण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागला, हें त्याचेंच द्योतक आहे. श्रुतिस्मृतींची जखडबंदी नसती, तर भारतीय तत्त्वज्ञानाची निकोप वाढ निश्चित झाली असती. आणि निबंध (टीका) वाङमय, भाष्यें यांऐवजी आपल्याला नव्या स्मृतींचा म्हणजे धर्मशास्त्राचा लाभ झाला असता. पण आता बुद्धि, तर्क यांना पूर्वीप्रमाणे मान राहिला नव्हता. त्यामुळे