पान:इहवादी शासन.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४० । इहवादी शासन
 

म्हटलें आहे. अर्थ-काम हे माणूस प्रत्यक्ष अनुभवूं शकतो. जातिबंधनांचें तसें नाही. त्यांनी मिळणारीं फलें अदृष्ट आहेत. तीं परलोकांत मिळावयाची असतात. स्मृति- रचना बंद झाल्यानंतर जे निबंधकार उदयास आले त्यांनी सर्वच धर्मशास्त्र अदृष्ट- फलार्थी करून टाकलें. म्हणजे मानवाने केवळ अंधपणें श्रद्धा ठेवून ते पाळलें पाहिजे. असल्या बंधनांनीच मानवी प्रतिष्ठेचा अपमान होतो, मानवी बुद्धि पंगू होते, मानवी मन नेहमी बाल, अप्रौढ असें राहतें.
 रघुनाथशास्त्री कोकजे म्हणतात, "वेदांपासून चालत आलेली दृष्टार्थतेची परंपरा सोडून देऊन, सर्व धर्मक्रिया जेव्हा पारलौकिक फळाकरिता, तसेच पुरुष- बुद्धीस न कळण्याजोग्या कार्याकरितांच असल्याचें ठरविलें जाऊं लागलें तेव्हापासून धर्माच्या अवनतीस प्रारंभ झाला.

एकतेला सुरुंग

 देश- काल- परिस्थिति, समाजाचा उत्कर्षापकर्ष यांचा विचार करून जर जातींची बंधने घातली असती, तर पतितांची शुद्धि व परदेशगमन यांचा निषेध धर्मशास्त्रज्ञांनी केला नसता. आठव्या शतकांत महंमद कासीम याने हजारो हिंदूंना बाटविलें होतें. पण देवल ऋषींनी नवीन स्मृति रचून त्या सर्वांना स्वधर्मात परत घेतलें. अकराव्या शतकांत या पतित- परावर्तनाला त्या वेळच्या विचारमूढ, अंध, शास्त्रीपंडितांनी बंदी केली त्यामुळे सक्तीने बाटविले गेलेले लाखो हिंदु मुस्लिमच राहिले आणि भारताची एकरूपता भंगून या समाजाची शकले झाली. पण हें दृष्ट फल झालें. त्याची चिंता धर्मशास्त्री त्या वेळी करीत नव्हते.
 परदेशगमनाचें हेंच झालें. प्राचीन काळीं व्यापार, धर्मप्रसार, साम्राज्य यांसाठी हिंदु लोक जगभर पर्यटन करीत. अकराव्या शतकांत तें निषिद्ध ठरले. त्यामुळे व्यापार मुस्लिम, ख्रिस्ती यांच्या हातीं गेला, धर्मप्रसार बंद पडला व भारतांतच परकी साम्राज्ये स्थापन झाली. म्हणजे या अंध धर्मशास्त्रामुळे भारताचें सर्व वैभव लयास गेलें. इहवादाची आवश्यकता भासते ती यामुळे. समाजावरची सर्व बंधने, सर्व कायदे सर्व दंडक हे बुद्धीने, अनुभवाने, अवलोकनाने, प्रयोगाने समाजाचा उत्कर्षापकर्षं कशांत आहे तें पाहून निश्चित करणें, याचें नांव इहवाद.
 परलोकवादांत हें घडत नाही. परलोक कोणी पाहिलेला नसतो, कोणाला माहीत नसतो. तेथे कशाने हिताहित होईल, हें कोणालाहि कळत नसतें. त्यामुळे तो पुढे ठेवून सांगितलेले धर्मशास्त्र संसाराच्या सर्व अंगोपांगांवर प्रभुत्व स्थापन करतें आणि मग अनर्थ होतो. युरोपांत रोम पीठाच्या बंधनांमुळे व मुस्लिम देशांत मुल्ला-मौलवींच्या बंधनांमुळे हेंच घडलें. भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा हाच अनुभव आहे. डॉ. काणे म्हणतात की, "भारतांतलें स्वराज्य नष्ट होत असतांना, धर्मशास्त्रज्ञ क्षुद्र व्रतमाहात्म्यें व प्रायश्चित्तें यांत गर्क होते. कारण त्यांना चिंता