पान:इहवादी शासन.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १३९
 

जखडलेलं असे. कोणत्या जातीने कोणती पगडी घालावी, धोतर कसें नेसावें, गंध कसें लावावें, जानवें कसें घालावें, घालावें की घालूं नये, यांविषयी कडक दंडक असत. भक्ष्याभक्ष्याचे व पेयापेयाचे तर अनंत नियम असत आणि त्यांत जरा गलती झाली की, प्रायश्चित्त घ्यावें लागे. न घेतलें तर वाळीत टाकलें जाई. जातीच्या स्पर्शास्पर्शा- बद्दल, पंक्तिभोजनाबद्दल, सावली पडणें, आवाज ऐकणें, पाहणें यांबद्दल सख्त नियम होते.
 धंदा-व्यवसाय, पोटाचा उद्योग यांचे नियम म्हणजे जाति-व्यवस्थेचा प्राण होता. कोणी कोणता व्यवसाय करावयाचा हें स्मृतिकारांनी लिहून ठेविलें आहे. पुढे रूढीने त्यांत अनेक बदल झाले. आणि अनेक ठिकाणीं 'शास्त्राद् रूढिः बलीयसी' असें होई. पण तें शास्त्र किंवा ती रूढि यांचे नियम दुर्लंघ्य होते. त्यांत प्रमाद झाल्यास बहिष्कार पडे आणि बहुसंख्यांनी प्रमाद केला असला, तर तेवढ्या लोकांची नवी जात होई.

रूढींचे दंडक

 शास्त्र व रूढि यांनी घातलेले दंडक पाहिले म्हणजे एक गोष्ट ध्यानांत येते की, त्या दंडकांना तर्काचा, कार्यकारणाचा, बुद्धीचा कसलाहि आधार नव्हता व नाही. याने आडवें गंध लावावें व त्याने उभे, याने त्याची सावली घेऊ नये, याच्या पंक्तीला त्याने बसूं नये, अमक्याने कांदा खाऊं नये, तमक्याने मासा खाऊं नये, या जातीने तो उद्योग करूं नये, त्या जातीने हा करूं नये, या जातीचे धर्मविधि वेदोक्ताने व्हावे, त्या जातीचे पुराणोक्ताने- या सर्व नियमांचा समाजोत्कर्षाशीं कसलाहि संबंध नाही, ती दृष्टि ठेवून हे नियम केलेलेच नाहीत. आणि यामुळेच हे नियम मानवी बुद्धीला प्रज्ञेला, मानवत्वाच्या प्रतिष्ठेला अत्यंत घातक होतात. न्या. मू. रानडे यांनी म्हटलें आहे की, "आपल्या अधःपाताचें मूलकारण म्हणजे आपणांवरची सर्व बंधनें हीं विवेक बंधनें नसून, तीं बाह्य व जड बंधने आहेत हें होय. यामुळे आपली मनें बाल्यावस्थेतच राहिली. स्वयंशासन, आत्मसंयम यांमुळे येणारी मानवी प्रतिष्ठा आपल्याला आलीच नाही."
 अमेरिकेंत अध्यक्ष ट्रूमन यांनी शिक्षण- पुनर्घटना समिति नेमली होती. तिने आपल्या इतिवृत्तांत म्हटलें आहे की, "व्यक्ति- जीवनाचें स्वयंसिद्ध महत्त्व व मानवी जीवनाची प्रतिष्ठा यांवरील श्रद्धा हेंच लोकसत्तेचें मूल महातत्त्व होय; आणि उच्च शिक्षणांत त्याचा प्रामुख्याने अंतर्भाव झाला पाहिजे."
 व्यक्ति-जीवनावरील व मानवी प्रतिष्ठेवरील ही श्रद्धा विवेकशून्य, तर्कहीन जातिबंधनामुळे समूळ नष्ट झाली. प्राचीन काळीं समाजहितासाठी देश-काल पाहून धर्मनियम करावे असें तत्त्व होतें, हें वर सांगितलेंच आहे. समाजहित, व्यक्तीचा उत्कर्ष हा तर्काने, बुद्धीने जाणतां येतो. धर्मामुळे अर्थ- काम साधतात, असें व्यासांनी