पान:इहवादी शासन.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८ । इहवादी शासन
 

नाही, लोकशाही नाही, सामाजिक, धार्मिक, आर्थिक कसलीहि क्रांति नाही, म्हणूनच राजकीय क्रांति नाही. या सर्व पुरुषार्थाचा मूल स्रोत म्हणजे विचार-स्वातंत्र्य, व्यक्तित्व, मानवत्वाची प्रतिष्ठा- तोच लोपला होता. भीमाच्या म्हणण्याप्रमाणे कामच या भूमीत नव्हता. भव्य, समृद्ध ऐहिक जीवनाची आकांक्षाच नष्ट झाली होती. कर्तृत्व येणार कोठून ?
 पाश्चात्य विद्या येथे येऊन ती आकांक्षा, तो काम पुन्हा जागृत होतांच ग्रीष्माच्या अखेर वाळून भाजून गेलेल्या सह्याद्रीच्या पहाडांवर मेघवर्षाव होतांच तेथे जशी उन्मेषाची नवी विरूढि फुटते तशी कर्तृत्वाची विरूद्ध या भूमींत फुटू लागली आणि दीड वर्षांच्या आतच तिने राममोहन, दादाभाई, रानडे, टिळक, रवींद्र, शरदबाबू, प्रेमचंद, रमण, जगदीशचंद्र, प्रफुल्लचंद्र रॉय, नारळीकर, सावरकर, आंबेडकर, सुभाषचंद्र, भगतसिंह, विवेकानंद, रामकृष्ण, अरविंद, दयानंद, राधाकृष्ण, भांडारकर, मुनशी, मुजुमदार, टाटा, बिर्ला, व्ही. शांताराम, सत्यजित रॉय, उदय- शंकर, पलुसकर, शिल्पकार करमरकर असे केवळ भारतांतच नव्हे, तर जगालाहि मान्य व्हावे असे पन्नास एक पुरुष तरी सहज निर्माण केले. केवळ भारतीय कीर्तीच्या दृष्टीने पाहिलें तर ही कर्त्या पुरुषांची नाममालिका दीड-दोनशंपर्यंत सहज जाईल. कर्तृत्वाचा भाव- अभाव, इहवादाच्या भाव- अभावाशी किती निगडित आहे, हें यावरून सहज दिसून येईल.

अविवेकी जातिसत्ता

 तमोयुगांत म्हणजे दुसऱ्या कालखंडांत भारतांतील कर्तृत्वाची जी हत्या झाली, ती अंध धर्माच्या सर्वंकष सत्तेमुळेच होय. युरोपप्रमाणे येथे धर्मसत्ता संघटित नव्हती हें खरें. पण येथील समाज- जीवनावर जातिसत्ता होती आणि ती धर्मसत्तेपेक्षाहि जास्त संघटित व तितकीच मूढ, अंध, क्रूर व अविवेकी होती. पोपच्या बहिष्कारापेक्षाहि तिच्या हातचें बहिष्काराचें, वाळीत टाकण्याचें शस्त्र फार भयंकर होतें. या जातिसत्तेला धर्मपीठांचा व राजसत्तांचाहि पूर्ण पाठिंबा असे. वर निर्देशिलेल्या मराठे, शीख यांच्या कर्त्या, ध्येयवादी, पुरोगामी राजांनी या जातिसत्तेला पाठिंबा दिला नाही. त्यामुळेच त्यांना कांही अंशी ध्येयसिद्धि करतां आली. पण हे सर्व अपवाद होत. एरवी जातींचे प्रश्न न्यायासनासमोर आल्यावर 'जुने मोडूं नये' याच कायद्याने निकाल होत असे. अशा रीतीने जातिसत्ता त्या युगात सर्वगामी, सर्वंकष व समर्थ झाली होती आणि तिनेच भारतीय जीवनातील क्रान्तिवृत्ति, व्यक्तित्वाचे उन्मेष, इहाकांक्षा– सर्व सर्व खुडून टाकले.
 जातींचीं बंधनें हीं त्या काळी सर्वंकष बंधने होतीं आणि तीं धर्मशास्त्राच्या किंवा वेळोवेळीं पडलेल्या रूढीच्या आधारें जारी केली जात. पोशाख, खाणेपिणें, प्रवास, परदेश निवास, विवाहादि संस्कार, देवपूजा, धर्मविधि, सर्व जातिबंधनांनी