पान:इहवादी शासन.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १३७
 

 पहिल्या कालखंडांत रामायण-महाभारत झालें; कालिदास-भवभूति झाले, नागार्जुन, आर्यभट्ट, वराहमिहिर, लल्ल, चरक, सुश्रुत हे शास्त्रज्ञ झाले. पाणिनी, पतंजली हे याच काळांतले. कपिल, कणाद, बुद्ध, महावीर यांचा हाच काळ होय. चंद्रगुप्त मौर्य, अशोक, गौतमीपुत्र शातकर्णी, समुद्रगुप्त, सत्याश्रय पुलकेशी, हर्ष, राष्ट्रकुट, गोविंद हे सम्राट् याच काळांत होऊन गेले. चाणक्य हा एकच राजनीतिज्ञ आपल्या डोळ्यांपुढे आज आहे. पण त्याने पूर्वीच्या नीतिशास्त्रज्ञांची पंचवीस-तीस तरी नांवें दिलेलीं आहेत; आणि भारताच्या सुवर्णयुगासंबंधी लिहितांना, हेंच पावलो- पावली दिसत असतें.
 प्रत्येक क्षेत्रांतील शेकडो नांवें आज विस्मृतींत गेलीं आहेत. वेरूळ, अंजठा, खजुराहो, घारापुरी यांचे शिल्पकार कोण, तें आपल्याला माहीत नाही. जगभर फिरून भारतांत सुवर्णाच्या राशि आणून ओतणारे व्यापारी- एकाचेंहि नांव आपल्याला ठाऊक नाही. त्या काळचे तानसेन, गंधर्व, उदयशंकर, गोपीकृष्ण यांचीं नांवें आपण विसरून गेलों आहोंत. रसायन, पदार्थविज्ञान, वैद्यक, उद्योग, प्रत्येक क्षेत्रांत त्या काळीं अनेकानेक संशोधक होऊन गेले, हें आज उपलब्ध झालेल्या इतिहासावरून स्पष्ट दिसते. पण आपल्याला त्यांची माहिती नाही. तरीहि त्या काळांत या भूमींत मानवी कर्तृत्वाला सर्व क्षेत्रांत अमाप बहर आला होता, यांत आता शंकेला जागा राहिलेली नाही.

कर्तृत्वाला ओहोटी

 दुसऱ्या कालखंडाच्या आरंभींच नव्या स्मृतींची रचना बंद झालेली दिसून येते. म्हणजे धर्माची परिवर्तनीयता संपली. पुढच्या काळांत फक्त निबंधकार म्हणजे स्मृतींचे भाष्यकार झाले. त्यांनी मीमांसकांची समन्वयपद्धति अवलंबून बुद्धिप्रामाण्य संपुष्टांत आणलें. देश-काल पाहून आपल्या बुद्धीने स्वतंत्र धर्मशास्त्र रचावयाचें ही धमक, ही प्रतिभा, हें बुद्धिस्वातंत्र्य या हजार वर्षांच्या काळांत भारतांत कोणीह प्रगट केलें नाही. विचारस्वातंत्र्य लोपलें, हाच याचा अर्थ होय. याच्या जोडीला निवृत्तिवाद, संन्यासवाद आला आणि ऐहिक वैभवाच्या आकांक्षाहि हळूहळू मंदावल्या व पुढे सुकून गेल्या. अर्थातच मानवी कर्तृत्व हळूहळू मंदावलें व पुढे आटून गेले. या हजार वर्षांत राजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांनी कांही असामान्य राज्यकर्ते निर्माण केले व भारताच्या बहुतेक प्रदेशांत ज्ञानेश्वर, तुकाराम, तुळशीदास, कबीर यांसारखे कांही सत्पुरुष उदयास आले. झाले ! हिशेब संपला. गणित, रसायन, पदार्थविज्ञान, वैद्यक, ज्योतिष हे प्रांत कोरडे दिसतात. राजनीति नाही, व्यापार नाही, उद्योग नाही, कृषि नाही; शिल्प, नृत्य, नाट्य नाही; धर्मासाठी, व्यापारासाठी, साम्राज्यासाठी परदेशगमन नाही, इतिहास- कादंबरी- काव्य नाही; कपिल नाही, पतंजली नाही, नवें युद्धतंत्र नाही; युद्धशास्त्र नाही. व्यक्तिवाद नाही, राष्ट्रवाद