पान:इहवादी शासन.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२ । इहवादी शासन
 

इहवादी लेखक कडक टीका करतात. हे धार्मिक विधि इहवादाच्या मूळ तत्त्वाला हरताळ फासतात, असें त्यांना वाटतें. हे व अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न भारताच्या इहवादित्वाविषयी आज उपस्थित होत आहेत. आणि भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांना फार महत्त्व असल्यामुळे त्यांची शास्त्रीय चर्चा होणे आवश्यक आहे. तशी चर्चा करणें हा या प्रबंधाचा उद्देश आहे. मात्र या विषयाची सर्व पार्श्वभूमि नीट समाजावी व वरील प्रश्नांची उत्तरे देण्यास, त्यासंबंधी निर्णय करण्यास, अवश्य ती माहिती उपलब्ध व्हावी म्हणून भारतापासून एकदम चर्चेला प्रारंभ न करतां, प्रथम रशिया-चीन इत्यादि कम्युनिस्ट देशांतील इहवादी शासनाचें रूप पाहण्याचें योजिलें आहे. त्यानंतर तुर्कस्थान, इजिप्त, सिरिया, इराक इत्यादि मुस्लिम राष्ट्रांतील इहवादाचा विचार करावयाचा आहे. तो विचार झाल्यावर आपल्याला युरोपचा प्रवास केला पाहिजे. पश्चिम युरोप हे इहवादाचे मूळपीठ होय. आजचें आपल्या इहवादाचें तत्त्वज्ञान आपण तेथूनच घेतलें आहे. म्हणून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली इत्यादि पश्चिम युरोपांतील देशांतील इहवादाचा प्रारंभापासूनचा इतिहास पाहणें अवश्य आहे- आणि त्या विवेचनांतून इहवादी शासनाच्या बहुविध अंगोपांगांचें दर्शन झालें, या विषयाकडे कोणत्या दृष्टिकोनांतून पाहणें युक्त आहे, तें ध्यानीं आलें म्हणजे मग नंतर भारताच्या शासनाची चिकित्सा करावयाची आहे. या आखणीप्रमाणे आता प्रथम सोव्हिएट रशिया व त्याच्या साम्राज्यांतील उझबेकिस्तान, ताजिकिस्तान इत्यादि देश यांतील इहवादाचा परामर्श घेऊ.


 इहवाद, इहवादी शासन ही तर सोव्हिएट रशियाच्या नेत्यांची प्रतिज्ञा आहे. कम्युनिस्ट देशांच्या जीवनाचा तो आद्य सिद्धान्त आहे. त्यांच्या मूळ पीठाचें तें प्रधान तत्त्व आहे. धर्माचें वर्चस्व, धर्मपीठाची सत्ता शासनावर व एकंदर ऐहिक व्यवहारावर असूं नये, इतकीच मध्ययुगांतील पंडितांची व शास्त्यांची मागणी होती. कम्युनिस्ट देशांत धर्मसत्ताच काय, मूळ धर्मच नष्ट झाला पाहिजे, अशी मागणी आहे व तसे तेथील शास्त्यांचे प्रयत्न आहेत. "परमेश्वरावरील श्रद्धा- हिच्याइतकें अमंगळ, तिरस्कार्य जगांत कांही नाही," असें लेनिनचें मत होतें. "धर्म हें एक आध्यात्मिक मद्य आहे. भांडवलशाहीचे दास त्या घाणींत आपली सर्व मानवी प्रतिष्ठा बुडवून टाकतात. त्यामुळे या लोकांना सभ्य किंवा सुसंस्कृत म्हणणें शक्य नाही," असें तो नेहमी म्हणत असे. "धर्मकल्पनेचा नायनाट आपण केला पाहिजे, सर्व भौतिक- वादाचा व अंशतः मार्क्सवादाचा तो पाया आहे," असें त्याचें प्रतिपादन असें.