पान:इहवादी शासन.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६ । इहवादी शासन
 

त्सवाचें वर्णन करून ठेवलेलें आहे. उत्तरकाळांतहि भारतांतील रजपूत, मराठे आदि राजांनी हें सहिष्णुतेचें व्रत अगदी निष्ठेने पाळलें होतें. ब्रिटिश सत्ता येथे प्रस्थापित झाल्यानंतर भारतांत लोकशाहीच्या तत्त्वांचा विचार सुरू झाला. त्या वेळी प्राचीन भारतांतील इहवादाची कसलीहि परंपरा अतूट राहिलेली नव्हती. बुद्धिप्रामाण्य नष्ट झालें होतें, विचारस्वातंत्र्य लोपलें होतें, धर्म हा परिवर्तनीय राहिला नव्हता, लोकशाहीची परंपरा तर नामशेषहि नव्हती. पण सहिष्णुतेचा वारसा मात्र भारतीयांनी टिकवून धरला होता. आजच्या भरतपुत्रांच्या राष्ट्रीय संसाराच्या योगक्षेमासाठी हें पैतृक धन शिल्लक राहिलेलें आहे हेंहि थोडकें नाही.
 बुद्धिप्रामाण्य, परिवर्तनीयता, प्रवृत्तिपरता इत्यादि इहवादी तत्त्वांच्या आश्रयाने भारताला प्राचीन काळीं जें वैभव प्राप्त झालें होतें त्याचा इसवी सनाच्या नवव्या- दहाव्या शतकापासून ऱ्हासकाल सुरू झाला व बाराव्या शतकाच्या अखेरीस त्या वैभवाला संपूर्ण ग्रहण लागलें. इहवादाचा लोप हेंच त्याचें कारण होय. आरंभी भारतांत त्या काळी वैभव होतें त्या अर्थी इहवाद असलाच पाहिजे असें म्हटलें आहे, तेव्हा वैभव लयास गेलें त्या अर्थी इहवाद लोपला असला पाहिजे हें अनुमान सहजप्राप्तच आहे आणि तें खरेंहि आहे. त्या सुमारास भारतांत अंध-धर्म-सिद्धान्तांचे वर्चस्व सर्व जीवनावर प्रस्थापित झालें.
 युरोपप्रमाणे भारतांत संघटित असें धर्मशासन केव्हाच नव्हते; पण या काल- खंडांत येथे जातिभेद अत्यंत बळावला होता. त्या जातींचें शासन हें युरोपांतल्या पोपच्या धर्मशासनापेक्षाहि कडक व समर्थ असें होतें आणि या सर्व जाति पोथिनिष्ठ धर्माच्या एकनिष्ठ अनुयायी होत्या. त्यांचें शासन सर्वंकष होते; पण युरोपांत धर्मशासन असेंच अंध व मदांध असूनहि तेथे त्याला आव्हान देऊन त्याच्या सत्तेवर घाव घालणारे अतिरथी- महारथी याच शतकांत निर्माण झाले. भारतांत तसे कोणी झाले नाहीत. त्यामुळे अनेक शतकें हा देश दुर्गतिपंकांत रुतून राहिला होता.


 इ. स. पूर्व ६०० ते ८०० हा चौदाशे वर्षांचा कालखंड, त्यानंतरचा इ. स. ८०० ते १८०० हा हजार वर्षांचा कालखंड आणि इ. स. १८०० ते १९५० हा दीडशे वर्षांचा कालखंड- भारताच्या इतिहासांतील या तीन कालखंडांची मानवी कर्तृत्वाच्या दृष्टीने तुलना केली तर काय दिसेल ? ही तुलना केली तर इहवादाचें मूर्त दर्शन आपल्याला घडेल. पहिला कालखंड म्हणजे भारताचें सुवर्णयुग होतें. दुसरा म्हणजे तमोयुग आणि तिसरा कालखंड जरी सुवर्णयुग नाही तरी, अरुणकांति- युग निश्चितच आहे.