पान:इहवादी शासन.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारत । १३५
 

मालव, शिबी, पटल इत्यादि लोकसत्ताक राज्यांची त्यांनी वर्णने केलीं आहेत. त्यांवरूनं ही शासनपद्धति भारतीयांना ज्ञात होती व ती त्यांनी अनेक ठिकाणीं प्रत्यक्षांतं आणली होती, याविषयी संदेह राहत नाही. आणि जर येथे लोकायत्त गणराज्यें नांदत होतीं हें मान्य केलें तर या भूमींत त्या काळीं इहवाद अत्यंत प्रभावी होता; हें ओघानेच मान्य करावें लागतें. कारण शब्दप्रामाण्यवादी, परलोकनिष्ठ, निवृत्ति- पंथीय, मौक्षैकदृष्टि लोक प्रजासत्ताक शासन कधीहि स्थापू शकणार नाहीत, चालवूं शकणार नाहीत.
 वर वर्णिलेलें जें विचारस्वातंत्र्य, जीवनाविषयीचा जो उत्साह, धर्माच्या अनेक व्याख्यांतून दिसून येणारी जी लोकवादी दृष्टि तिच्यांतूनच लोकायत्त शासनाची कल्पना उदय पावूं व पोसूं शकते. हें ध्यानांत घेतलें, तर त्या काळांत केवळ वरच्या प्रतिष्ठित विद्याविभूषित वर्गापुरताच इहवाद प्रसृत झाला होता असें नसून, तें तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत जाऊन पोचलें होतें व रुजलेंहि होतें असें म्हणावें लागतें. भारतांत व्यापारसमृद्धि, साम्राज्यसत्ता व धर्मनीतितत्त्वें यांची प्रस्थापना करूनच न थांबतां येथले कर्ते, पराक्रमी पुरुष त्या ईष्येने सर्व विश्वांत संचार करीत होते, तो त्यावांचून कदापि शक्य झाला नसता.

धर्मस्वातंत्र्याचा पुरस्कार

 भारतांतील प्राचीनकाळच्या इहवादाचें मोठें लक्षण म्हणजे धर्मसहिष्णुता हें होय. विचारस्वातंत्र्य आल्याबरोबर, विशेषतः आत्मा, परमात्मा या तत्त्वांबाबत वाटेल ते विचार मांडण्यास स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर धर्मस्वातंत्र्य व धर्मसहिष्णुता अपरिहार्यपणेंच येते. प्राचीन भारतांत, कांही अपवाद वजा जातां दीर्घकालपर्यंत धर्मसहिष्णुता नांदत होती याबद्दल आता कोणालाच शंका राहिलेली नाही. अशोक, खारवेल हे बौद्ध, जैन राजे तर धर्मसहिष्णु होतेच. पण सातवाहन, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट हे वैदिक धर्माचे एकनिष्ठ उपासक सम्राटहि सर्वधर्मसमानत्व मानून आपल्या भिन्नधर्मीय प्रजेला पूर्ण सहिष्णुनेते वागवीत हें मशहूर आहे. सातवाहन कुळांतला गौतमीपुत्र गोब्राह्मणांचा रक्षणकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. पण बौद्धयतींना त्याने व त्याच्या प्रजाजनांनी त्यांच्या योगक्षेमासाठी अनेक देणग्या दिल्याचे दिसून येतें. महाराष्ट्रांतील कार्ले, भाजे हीं लेणीं म्हणजे त्याचीच साक्ष होय.
 मलबारच्या राजांनी याच काळांत ख्रिस्ती व यहुदी लोकांना आश्रय देऊन धर्मस्वातंत्र्याचे ताम्रपटहि दिले होते. मगधाच्या गुप्त घराण्यांतील राजांनी अश्वमेध करून अखिल भारतांत साम्राज्य स्थापन केलें होतें, पण त्यांतील कांही राजांनी बुद्धाच्या मूर्तीची स्थापनाहि केली आणि बौद्धांना मठहि बांधून दिले. सम्राट् हर्ष दर पांच वर्षांनी विश्वजित यज्ञ करून त्या प्रसंगी सर्वधर्मीयांमध्ये आपल्या संपत्तीची सारखी वाटणी करून टाकीत असे. चिनी बौद्ध प्रवासी ह्यू-एन्-त्संग यानेच या महो-