पान:इहवादी शासन.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४ । इहवादी शासन
 

उद्योग करतात. लोक समुद्रपर्यटन करतात, विदेशगमन करतात तें कांही वासना त्यांना असतात म्हणूनच. ऐहिक कामावांचून कोणी उद्योग करणार नाही; धाडस, साहस करणार नाही. म्हणून काम ही प्रपंचाची मूल प्रेरणा आहे. अर्थ व धर्म तिच्या गर्भात असतात."
 धर्मापेक्षा अर्थ-काम श्रेष्ठ होत असे सांगण्याइतकें विचारस्वातंत्र्य त्या काळी होतें, इतकेंच नव्हे, तर परमेश्वर, आत्मा यांना अस्तित्वच नाही असे प्रतिपादन करणारे जे दर्शनकार होते त्यांनाहि त्यांचें तत्त्वज्ञान मांडण्याचें पूर्ण स्वातंत्र्य होतें. सांख्यदर्शनाचा प्रणेता कपिल महामुनि हा नास्तिक होता. प्रकृति व पुरुष यांचा खेळ म्हणजे हा संसार होय, यापलीकडे परमेश्वर असें कांही तत्त्व नाही असा त्याचा सिद्धान्त होता. वैशेषिक दर्शनाचा कर्ता कणाद व मीमांसा दर्शनाचा जैमिनी हेहि नास्तिकच होते. चार्वाक तर याहि पलीकडे गेला होता. परमेश्वर, आत्मा हीं तत्त्वें तो मानीत नसेच; पण वैदिकांच्या तत्त्वज्ञानांतील मौलिभूत जो कर्मसिद्धान्त तोहि तो मानीत नसे. देह हाच आत्मा होय, असें त्याचें मत होतें. वेद हे भंड, धूर्त, निशाचर यांनी रचले आहेत, असें तो म्हणे. असे असूनहि त्याला इतरांच्या बरोबरच दर्शनकार ही प्रतिष्ठा मिळाली होती. विचारस्वातंत्र्याचा हा अगदी कळस होय.
 असें स्वातंत्र्य होतें म्हणूनच या दर्शनकारांना सृष्टीची घडण, तिच्या घटकांचें पृथक्करण, ज्ञानाचा अधिगम करण्याच्या पद्धति, यांविषयी आजहि थोड्याफार प्रमाणांत मान्य असलेले सिद्धान्त प्रस्थापित करतां आले. भौतिक जडसृष्टीचें पृथक्करण करून तिचे मूलभूत पंचवीस घटक आहेत, हें सांख्यांनी शोधलेलें तत्त्व आहे. वैशेषिक व न्याय यांच्या प्रणेत्यांनी अणुवाद सांगितला आहे. वाक्यार्थ निर्णयाची 'उपक्रमोपसंहारौ' इत्यादि जीं तत्त्वें मीमांसकांनी सांगितलीं तीं आजहि कायदेशास्त्रांत उपयुक्त ठरतात. न्यायदर्शनकार गौतम याने भारतीय तर्कशास्त्राची प्रस्थापना केली. सृष्टीचा असा अखंड अभ्यास त्या काळी होत असे म्हणून त्यांतून रसायन, पदार्थविज्ञान, गणित, ज्योतिष, जीवशास्त्र, वैद्यक अशी शास्त्रे उदयास आली व भरतभूमीला अपूर्व असें वैभव प्राप्त झालें.

लोकायत्त शासन

 प्राचीन भारतांत लोकशाही रूढ झाली होती असे मानणारी एक विद्वानांचा पंथ आहे. डॉ. जयस्वाल हे त्यांतील अग्रणी होत. त्यांचे सिद्धान्त सर्वमान्य झाले आहेत असें नाही, पण कोणत्या ना कोणत्या दृष्टीने ज्यांना लोकायत्त शासनें असें म्हणतां येईल अशी गणराज्ये दीर्घकाळपर्यंत भारतांत होतीं, याविषयी मात्र दुमत नाही. महाभारत, चाणक्याचें अर्थशास्त्र, बौद्धांचें अवदानशतक या ग्रंथांत याविषयी भरपूर पुरावा मिळतो. शिकंदराच्या स्वारीबरोबर आलेल्या ग्रीक पंडितांनीहि याविषयी निर्वाळा दिलेला आहे. शिकंदराशी सामना देणाऱ्या कठ, सौभूती, क्षुद्रक,